बुधवार, २ जुलै, २००८

कावळा

आटपाट नगरात एक गरीब कष्टकरी कुटुंब रहात असते. ३ मुलं आणी त्यांचे आई बाबा. आई वडील दोघेही मजुर आणी कुटुंबाचे बस्तान एका लहानग्या झोपडी मधे.एका वर्षी प्रचंड असा दुष्काळ पडतो. ते गरीब कुटुंब अन्नाला महाग होते. घरात असलेले किडुक मिडुक विकुन कसातरी आला दिवस ढकलने चालु असते. हळुहळु परिस्थिती अजुनच बिकट होते. मुले लहान असतात, त्यांचे पोट भरावे म्हणुन ते दोघे अर्धपोटी रहायला सुरुवात होते. नवरा एक दिवस रोजच्या त्रासाला कंटाळुन तिरीमिरीत घर सोडुन परगांदा होतो. आई ला धीर सोडुन चालणार नसते, ती लेकरांना कशी सोडून जाणार, ती कंबर कसते आणी कसेबसे आपल्या लहानग्यांचे पोट भरायला सुरुवात करते. पण दिवस अजुनच वाईट येतात. कुटुंबाची अन्नान्न दशा होते. रोजच्या उपासमारीने एकादिवशी बिचारी दगावते.

आता घरात ३ मुले. मोठा जेमतेम ५ वर्षांचा मधला ३ वर्षांचा आणी लहानगा फ़क्त १ वर्षांचा. आई बोलत का नाही, नुसती झोपुनच का आहे या विचाराने भांबावलेले पोरं अन रड रड रडणारा सगळ्यात लहाना छोटु. यथावकाश ४ लोक जमा होतात अन त्या मुलांच्या आईचे क्रियाकर्म उरकले जाते. नंतरचे दिवस खरे परीक्षेचे असतात. लेकरांचे अगदी हालहाल होत्तात. दहाव्या दिवशी कुठुन तरी मुलांचा मामा येतो आणी येतांना बांधुन मुठ्भर तांदुळ आणतो. मुले आनंदतात, त्याना वाटते आज मामा आला आज चांगले जेवायमला मिळनार. पण मामा सांगतो बाळानो आज आईचा १० वा दिवस आधी गंगेवर जायला हवे.

मुले बिचारी २ दिवसांची भुकेली तशीच मामा बरोबर गंगेवर जातात. मामाने भाताचा पिंड करुन कावळा शिवायसाठी ठेवलेला. सगळ्यात लहाना भुकेने पार व्याकुळ झालेला. मोठा मुलगा म्हणतो मामा अरे थोडा भात दे ना छोटुला. तर मामा म्हणतो बेटा आधी कावळा शिवुदे पिंडाला. बराच वेळ होतो कावळा काही पिंडाला शिवत नव्हता, इकडे पोरं भुकेनी अगदी व्याकुळ झालेली.

बराच वेळ होतो लहाना रडुन रडुन अगदी अर्धमेला होतो. अजुन एकदा लहाना असेल नसेल त्या ताकदीने जोरात रडायला सुरुवात करतो आणी तोंडातुन फेस येउन आचके देउन बेशुद्ध पडायला येतो. मोठया मुलाला रहावत नाही, त्याला काय होते ते समजतही नसते त्याला फक्त त्याच्या पोटातला आगडोंब छोटुच्या पोटात पण आहे एवढेच समजत असते. तो मामाचा हात झिडकारतो अन पळत जाउन त्या पिंडामधला एक घास भात छोटुला भरवतो. पुढच्याच क्षणी झर्रकन झेप घेउन एक कावळा त्या उरलेल्या पिंडाला शिवतो.

नोंदः लेखन इतरत्र पुर्वप्रकाशित.

या लेखाला मिसळपाव डॉट कॉम वर मिळालेले प्रतिसाद पहा.