बुधवार, १६ एप्रिल, २००८

आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे ..




तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु.


तुला आठवतो का ग आपला एखादा प्रवास ? मला खिडकीचीच जागा हवी म्हणुन हट्ट असायचा तुझा, अन जागा मिळाल्यावर काय तो ओसंडुन वहाणारा आनंद. गाडी हलली - जssरा गार वारा लागला की बोलता बोलता आपसुक डोळे मिटायचे तुझे आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे. खाचखळग्यात झटका बसुन तुझे डोके पुढे आदळु नये म्हणुन दुसर्‍या हाताने मी तुझ्या हनुवटीला अलगद आधार देउन ठेवायचो. भुरभुर उडणारे तुझे केस माझ्या कानाला, गालांना गुदगुल्या करायचे आणी मग शेवटी न रहावुन मी त्यांना सावरायचा प्रयत्न करायचो, या सगळ्यात तुझा डोळा उघडायचा आणी मग तु मला रागे भरायचीस,


"काय रे! दोन मिनीटे काही जिवाला शांत बसु देणार नाहीस, आत्ता कुठे थोडा डोळा लागला होता तर ...".असं थोडं काही मनाविरुद्ध झालं की लगेच रुसायचीस तु, गाल फुगवुन बसायचीस आणी दोन मिनीटात बाहेरची गम्मत जम्मत पाहण्यात रमुन पण जायचीस. माझ्या हाताला लागलेली कळ कधी लक्षात आली होती का ग तुझ्या ?



हा आणी असेच कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवुन गेलीस तु, अशाच एका एका प्रवासात अलविदा म्हणालीस अन नव्या प्रवासाला निघुन गेलीस नव्या दिशेला. तुझा तो अलविदा कळायला मला जरा उशीरच झाला. माझा तर प्रवासच खुंटावला आणी दिशा पण हरवल्या, जसा झोकात उडणारा एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा.



आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे
दुनिया ने फिर न पूछा, लूटा है मुझको कैसे
न किसी का साथ है, न किसी का संग
मेरी ज़िंदगी है क्या.............