बुधवार, २० फेब्रुवारी, २००८

हज़ारों ख्वाहिशें ऐसी ......


मी मनात तो विषयच येउ देत नाही,अगदीच मनाचे सगळे बंध तोडुन आला जरी; तरी दुर ढकलुन देतो मी त्याला, अगदी दुर. अन तरीही त्रास होत राहीला तर मग मी जप करतो, पुस्तके वाचतो.

खरे तर मी तिच्या अस्तित्वालाच नकार दिलाय..... तरीपण स्वप्नाच्या अन सत्याच्या धुसर सीमेवर ती मला भेटतच रहाते ... वेगवेगळ्या रुपातुन .. कधी सहचारिणी बनुन तर कधी अभिसारिका बनुन. कधी रागावते ओरडते तर कधी काळजी घेते, माझ्या जखमांना औषध लावते. कधी त्याच्या बरोबरच्या प्रेमाच्या सुरस गोष्टी मला सांगते अन मला स्वप्नातल्या जिवंतपणी उभा जाळते. मी खडबडुन उठतो .. तोंडावर पाणी मारतो अन तयार होतो खर्‍या खर्‍या जगातल्या खोट्या खोट्या आयुष्यात जायला .. स्वप्न कोणते असते तेच समजत नाही!! जागेपणी जगतो ते का झोपल्यावर अनुभवतो ते ? अजुन अशा बर्‍याच गोष्टींचा थांगपत्ता लागायचाय.

तसेच तुझे अचानक जाणे. रणरणत्या उन्हातुन थंडगार पाण्याचा माठ भरुन आणावा अन सावलीत आल्याआल्या कोणीतरी टचकन त्याला खडा मारुन फोडुन टाकावा, आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! असे काहीसे तुझे जाणे. तु गेलीस हे मात्र खरे, अगदी कायमची गेलीस माझ्या आयुष्यातुन. अशी गेलीस की कधी होतीस का नव्हतीस असा प्रश्न पडतो मनाला. तुझ्या असण्याचे हजार पुरावे असतात अवतीभोवती, सगळ्यांना खोटे ठरवण्याची कारणं शोधता शोधता माझीच ओळख विसरायला होते कधी कधी.

हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले ।
निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन,
बहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकले ।

- आनंदयात्री