बुधवार, ४ जून, २००८

हा भास म्हणु की....

"सर, टु हिंजवडी ऑर टु कोथरुड फस्ट ?"

असे ड्रायव्हरने विचारताच मांडीवरचा ल्यापटॉप बाजुला ठेउन त्याने समोर नजर टाकली, जवळ जवळ येणारा वाकडचा फ्लायओव्हर ओळखीचा वाटला पण आजुबाजुचा भाग मात्र आधी होता तसा मोकळा मोकळा अजिबात राहिला नव्हता. चकचकीत इमारती अन सुसाट जाणार्‍या गाड्या त्या फ्लायओव्हरची ओळख पुसट करत होत्या. विसएक वर्षात पुणे बरेच बदलले होते.

"लेट्स हॅव ब्रेकफास्ट इन कोथरुड फस्ट !", तो कोरडेपणे उत्तरला. गाडी उजवीकडे न वळता सरळ चांदणी चौकाकडे धावायला लागली.

त्याची भिरभिरती नजर आजुबाजुच्या परिसरात ओळखीच्या खुणा शोधत होती,

हा भास म्हणु की आहे तुझाच गाव ..
बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव ..

तो गुणगुणला. डाव्या बाजुला बरेचसे ओळखीचे एक तळे अन त्यासमोरचे शिवमंदिर दिसले, हो बहुदा शिवमंदिरच होते ते, आणी तेच मंदिर होते ते. ऑफिसमधुन घरी जातांना हमखास गाडी वळायची त्यांची तिकडे. गारेग्गार एसी मधल्या मुर्दाड हवेपेक्षा तळ्याकाठच्या बाकावरचा तो उधाण मोकळा वारा त्यांना मोहवायचा. दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी अगदी "आज चहा मेला अगदीच फुळ्ळुक होता" पासुन ते अप्राईजल मीटींगमधे बॉस्स ने कसे पिडले इथपर्यंतच्या गुजगोष्टी बहरायच्या. किती सांगु किती नको असे व्हायचे तिला, चिवचिवाट एकुन आजुबाजुची रोज भेटणारी एकदोन म्हातारी खोडं गालातल्या गालात हसायची अन हळुच तिच्या डोक्यावर टपली मारुन तिला भानावर आणायची. प्रमोशनच्या खुशीपासुन ते तिच्या आईने दिलेल्या होकारापर्यंतचे जवळपास सगळे आनंद त्या शिवशंभोच्या साक्षीने साजरे व्हायचे.

आभास असे की जीव खुळावुन जाई..
मन बासरी होवुनी तुझीच गीते गाई..

त्याकाळातली त्यांची ती छोटीमोठी स्वप्ने त्या नंदीला आठवत असतील का ? रोज तिला बबडी म्हणुन हाक मारणारा म्हातारा नंतर कितीतरी दिवस आपल्याला शोधत असेल ! अन मग एका क्षणात वेदनेचा चित्रपट झरझर त्याच्या डोळ्यासमोरुन निघुन गेला.

दुपारी २ वाजता हलका लंच करुन ठरलेल्या शेड्युल प्रमाणे तो मीटिंग रुम कडे वळाला. काही क्षणातच टकटक वाजवुन दार उघडले गेले. पुर्णतः बिझनेस फॉर्मल्स मधली एक साधारण चाळीशीची स्त्री लगबगीने आत शिरली. थक्क होउन तो पहातच राहिला. उठुन अभिवादन वैगेरे करायचे सगळे एटिकेट्स विसरुन तो अवाक होउन बघत होता.

वादळात हलते झुम्बर दाही दिशांचे..
ये पाउस होवुनी झिरपत आर्त मनाचे..

अंगातले ब्लेझर बाजुला टाकुन त्याने कारचे दार ओढुन घेतले अन काच खाली केली, ती लांबुन हात हलवुन त्याला बाय म्हणाली असावी, यांत्रिकपणे त्याचा हात हलला. टायची क्नॉट थोडी मोकळी करुन त्याने डोके मागे टेकवले अन डोळे मिटुन जरासा विसावला. थोड्या वेळाने त्याने मागे वळुन बघितले, वाकडचा फ्लायओव्हर मागे पडला होता अन धुराळा उडवत त्याची गाडी पुन्हा मुंबईकडे धावु लागली होती.

वार्‍यावर अवचित उठे धुळीचा लोट..
अन हरवुन जाई तुझ्या गावची वाट..
हा भास म्हणु की आहे तुझाच गाव ..
बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव ..


(वरील लेखात उल्लेखलेल्या काव्यपंक्ती फुलवा यांच्या एका कवितेतील आहेत.)
या लेखाला मिसळपाववर मिळालेले प्रतिसाद पहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: