शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे ..

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारे !
आहे घरासचि असें गमतें मनांस
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !

एका आळसावलेल्या दुपारी, भरल्या पोटी डोळा लागल्यावर मी 'घरी' पोचलो. लांबुन जेंव्हा घर दिसले तेव्हा दारातली कण्हेर मला वाकुन पाहत होती आणि पारिजातकही तिच्यामागुन डोकावत होता. जसे घर जवळ आले तशी रांगोळी दिसली आणि दारात पोचताच दिसले आंब्याच्या पानांचे तोरण. आत शिरताच अगदी आतल्या खोलीतले .. बाहेरुनही थेट दिसणारे देवघर, तिथे तेवत असलेली समई आणि पोपटी पार्श्वभुमीवर लाल गेरुने काढलेली वेलबुट्टी.

स्वयंपाकघरातुन बाहेर पडल्यावर येणारा छोटासा चौक, समोरचा गच्चीवर जाणारा जिना आणि जिन्याखालचा हौद. हौदातल्या गारेग्गार पाण्याने तोंड खसखसुन धुतले आणि तसेच हातपायही धुतले की आपण थकलो होतो ही जाणिवही धुवुन जाते. मी ताजातवाना होतो. मोकळे ढाकळे घरातले कपडे घालुन मस्त विसावतो.

आता माझ्या हातात नेसकॉफीचा कप आहे, नुकताच तरुण भारत वाचुन झालाय आणि समोरुन लोकमत आणायला लहान्या भावाला पिटा़ळलेय. गणपतीबाप्पाच्या जोडीने घरात महालक्ष्मी आलीये. ओल्या नारळाच्या करंज्याचा खरपुस गोडसर वास मला मोहावतो, स्वयंपाकघरात कोणी नाही तो क्षण गाठुन एखादी करंजी उडवायचा बेत पक्का होतो. रिकामा कप ठेवायच्या निमित्ताने मी स्वयंपाकघरात शिरतो आणि जरासा घुटमळतो, तोच आज्जी दरडावते "आता मोठा झाला आहेस, उद्याच्या नैवेद्यासाठीचा प्रसाद आहे तो, उद्या मिळेल." मी हळुच तिथुन निसटतो.

आमच्या गौरींचे मुखवटे पितळी आहेत, दोन का असे विचारल्यावर, एक आईची आणि एक आज्जीची असे उत्तर मिळते. रांगोळीच्या पावलांनी लक्ष्मी येते, वाजतगाजत येते, एव्हाना ताम्हण वाजवायचे माझे काम लहान्या भावाकडे गेलेले आहे. देवींची यथासांग प्रतिष्ठापना होते.

उद्या लक्ष्मी घरी जेवणार, पंचामृत, कोशिंबीरी, कितीतरी भाज्या आणि गोडधोडाची रेलचेल उडणार. बरेच पाहुणे दुपारच्या जेवणाला असणार. आज्जी आणि आई रात्री उशिरापर्यंत काम करत राहणार, आणि उद्या पहाटे पहाटे उठणार. एव्हाना बेसनाचे, रव्याचे लाडूही वळुन झालेत ...

-----------------------------------------

कर्णकर्कश्य आवाजाने मी हडबडुन उठतो, दाण्णकण जमिनीवर आदळण्यावर झाल्यासारखी घाणेरडी फीलींग आलीये, आगीचा बंब भेसुर ओरडत जवळच्या हमरस्त्यावरुन चाल्लाय, मी कावराबावरा झालोय.  पॅटिओतुन डोकावतो, बाहेर विजांचा दणदणाट चाल्लाय, सिविअर वेदरचा अलर्ट कर्कश्य करवादतोय.

जाणवते, 'माझे घर' इथुन फार फार लांब आहे, त्या घरात आता आज्जी नाही, कोणीही नाही, ते घरही आता माझे नाही. आणि आज्जी तर आता नाहीच. ती नकोशी जाणिव मला परतवता येत नाही. हंबरडा फोडावासा वाटतो, पण मी तसाच थांबतो, घसा गोठुन दगडाचा होतो. न राहवुन मी शेवटी माझ्या छोट्याश्या देव्हार्‍यासमोर जाउन उभा राहतो, डोळे मिटतो. कोणतेही आर्जव करण्याआधीच दोन चिमुकले हात माझ्या पायांना धरुन उभा राहण्याची धडपड करतांना जाणवतात ...



 

रविवार, २९ जुलै, २०१२

हरवलेलं सुख ..

"रेहने को घर नही .. सोने के बिस्तर नही .. अपना खुदा है रखवाला ssssssssssss" अशी तान घेत मी बंद गेटवर धाडकन सायकल घातली, गेटची दोन्ही दारं मागं आपटुन वेगानं रिबाउन्स झाली, मला ते सवयीचं असल्यानं मी शिताफीने एक दार सायकलच्या पुढच्या चाकावर आणि दुसरे दार हातानी धरले .. सायकल व्हरांड्यात वाकडी पार्क केली, कॅरिअर आणि सीटच्या बेचक्यातले लॉक लाउन चावी काढली आणि घरात शिरलो. आजोबांनी लगेच "बबड्या गेट लाव आधी" म्हणुन उलटा पाठवला.

घरात आले की बुट काढायचे, दप्तर कप्प्यात ठेवायचे, दंड जागच्या जागी कोपर्‍यात उभा करुन ठेवायचा, हात पाय तोंड धुवायचे, घरातले कपडे घालायचे आणि देवासमोर पर्वचेला बसायचे हा रोजचा नियम. सातच्या बातम्या लागाण्याआधी बोर्नव्हिटा पिउन झालेला असायचा. मग आज शाखेत शिक्षकांनी कोणते कोणते खेळ घेतले, त्यात मीच कसा जिंकलो, बंड्या कापसे ला कसे लोळवले वैगेरे वर्णनं आईला तिखटमीठ लाउन सांगायची. कधेमधे छोटं मोठं खरचटायचं मग आई त्यावर हळद लावायची, मी आईला म्हणायचे बँड एड लाव, ती म्हणायची मोठं काही लागलं तर बँड एड लावतात, उगाच नाही. त्या काळात बँड एडच्या पट्ट्या नवीन आलेल्या होत्या, मला बँड एड लाउन वर्गात स्टाईल मारायची फार इच्छा होती.  बातम्या चालु असतांना गृहपाठ चालु झालेला असे. पाठ असल्या तरी आज्जी उगाचच कविता म्हणुन घेई. दादा ताईचा अभ्यास आधीपासुन चालु असे, त्यांच्या नेहमी दोनशे पानी वह्या असत. साडे आठ नउ पर्यंत मुलांची पहिली पंगत बसे. मला गरमा गरम तव्यावरची पोळी आवडे, मी आईला तवा पोळी वाढ असे म्हणे. आईजवळ कितीही तुपसाखरेसाठी हट्ट केला तरी ती देत नसे, चेहरा पडला की आज्जी तिच्या खास अधिकारात तुपसाखर वाढे :)

आजोबांचे जेवण झाल्यावर ते शतपावलीला मला त्यांच्याबरोबर घेउन जात, आमच्या गल्लीत मोठाले हॅलोजनचे पिवळे दिवे तेंव्हा लावलेले होते, दिव्याकडे पाठ करुन चालतांना त्यांच्या उंच धिप्पाड सावली बरोबर माझी बुटुक बैंगण सावली सावली चाले. आम्ही घरी जाउत तोवर निजायची तयारी झालेली असे, मी माझ्या आजोबांजवळ झोपायचा हट्ट करे. त्यांची धुवट सोलापुरी चादर मला फार आवडे. आजोबा मला नेहमी भिंतीच्या बाजुने झोपवीत. आजोबांच्या डोक्यावर आणि छातीवर पांढरे पांढरे केस होते आणि त्यांची त्वचा किंचित सुरकुतलेली होती. त्याकाळच्या माझ्या चेहर्‍याएवढा त्यांचा तळहात होता, तो मउ नव्हता .. पण रखरखीत पण नव्हता, त्यांच्या तळव्याची त्वचा जाड होती. त्यांच्या तळव्याच्या विरुद्ध बाजूच्या हातावर टप्पोर्‍या धमन्या उठुन दिसत, मला त्या ताकतीचे चिन्ह वाटे, मला त्यांच्याशी खेळायला मोठी मौज वाटे. मी त्यांना विचारे "आबू माझ्यात एवढी ताकत कधी येणार हो ?" ते म्हणत "तु सध्या फक्त पाचच सुर्यनमस्कार मारतोस ना .. जेव्हा दिवसाला एक्कावन्न मारायला लागशील तेव्हा होतील." मग ते मला मी तोवर कधीही न पाहिलेल्या पुण्याबद्दल सांगत, व्यायाम करायला ते पळत पर्वतीवर जात, तिथे किती जोर मारत, मग खाली आल्यावर बादशाही बोर्डिंग मध्ये दुध पित वैगेरे गोष्टी आम्हा सगळ्या भावंडांना माहिती झालेल्या असत. मला ते थोपटवुन झोपी घालायचा प्रयत्न करत, पण मी गोष्ट सांगा म्हणुन मागे लागलेला असे. आजवर शिवाजीच्या गोष्टी, रामाच्या अर्जुनाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगुन झालेल्या असत. मी नवी गोष्ट सांगा म्हणुन हट्ट करे. त्यांनी यावेळेस स्वातंत्र्यलढ्यातली एखादी गोष्ट निवडलेली असे, एव्हाना दादा ताई पण अभ्यास संपवुन आमच्या जवळ आलेले असत.

शेजार्‍या पाजार्‍यांचे दिवे बंद व्हायला सुरुवात झालेली असे, आजोबांच्या पलंगावर मी त्यांच्या मांडीवर डोके ठेउन कधीच झोपी गेलेला असे. स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट ताई दादा पुढे पुर्ण एकत असत..

हरवलेलं सुख ..

रविवार, २२ जानेवारी, २०१२

मला आवडलेली कविता - गुरफटलेली आसवे

शनिवारच्या सुट्टीची दुपार नुसती झोपून आंबवलेली असावी, अगदीच अंधारुन आल्यावर .. कातरवेळही गडद झाल्यावर तुम्ही जडावल्या डोळ्यांनी उठावे आणि वाचनात ही कविता यावी .. गुरफटलेली आसवे

यशस्वी ललित लेखनाची टेस्ट काय असावी ? कमी शब्दातली मांडणी ? कमी शब्दातली अर्थवाही मांडणी ? हां अल्पाक्षरत्व ! हीच खरी ललिताची टेस्ट .. वाचकांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फोडणारी .. दिर्घकाळ जिभेवर चव रेंगाळवणारी रचना .. ललित म्हणजे अशी जादू की जी प्रत्येकाच्या मनात, एका युनिक, वेगळ्या कथेचा रंगमहाल उभा करते .. जो ज्याच्या त्याच्या अनुभवांच्या आणी मानसीच्या चित्रकाराच्या ताकतीनुसार कमी अधिक रंगीत, गुढ, भव्य असावा .. असेलही कदाचित. असे ललित, ज्यात एखादे कथाबीज बेमालुम लपवलेले आहे, माझ्या मनात परिकथेतल्या आकाशापर्यंत पोचणार्‍या झाडासारखे सरसर मोठे होते. जादूई रंगमहाल उभा करते. या फक्त चार ओळीच्या कवितेत ही ताकत कशी आली असावी याचे कोरडे विवेचन करण्यापेक्षा माझ्या जादूई रंगमहालातले एक दार इथे किलकिले करतो ..

कवितेच्या पहिल्या वाचनातच कविता किती अर्थवाही आहे याची ताकत यावी. माझे डोळे पुनर्वाचनासाठी पुन्हा पहिल्या ओळीवर स्थिरावले. चित्रदर्शी ... हो निखळ चित्रदर्शी पहिल्या दोन ओळी. या ओळीतच मानसीच्या चित्रकाराला भलामोठ्ठा कॅनव्हास मिळावा आणी त्याचे कुंचले सरसर फिरायला लागावेत.

काळोखात आसवे आपली
दिली-घेतली, गुरफटलेली.


अंधार्‍या शयनगृहात, एकमेकांवर निरातिशय प्रेम करणारे दोन जीव एकमेकांच्या मिठीत गुरफटलेले असावेत. कसल्या अज्ञात कारणाने ते एकमेकांपासुन दूर होणार असावेत आणि त्या जाणिवेने होणारा आर्त अश्रूपात दोघांनाही अनावर असावा. कदाचित अंखंड चुंबनाच्या वर्षावात ... किंवा भिजलेल्या चेहर्‍याच्या जवळीकीने एकमेकांची आसवेही एकमेकात मिसळून जावीत. प्रेमाच्या या अत्युच्च उत्कट अनुभुतीवर स्वार त्या जोडप्याला आपल्या आसवांच्या मिलनाची ओढ जाणवावी, दूर जाणे बिकट होत जावे आणि एकाने जीवाने दुसर्‍याला विचारावे ..

कोणती तुझी? कळलेच नाही.
माझी ओळखलीस का, तूही?


कोणती आसवे तुझी ? मला कळलेच नाही. तुला माझी आसवे ओळखता येतात ? का तुही तिथेच पोचली आहेस जिथे मी आहे ? (मला कळलेय की आता आपण एकमेकांचे इतके झालो आहोत की आपल्या आसवांनाही एकमेकांची ओढ आहे, तेही एकमेकांत इतके बेमालूम मिसळतात की वेगळे करणे अवघड व्हावे. आसवांची ही कथा तर तू आणि मी वेगळे होण्याची काय कथा ..)

------

ब्राव्हो धनंजय .. ब्राव्हो !!

(श्रेयअव्हेरः वर पहिल्या परिच्छेदात नमुद केल्याप्रमाणे कवितेचे श्रेय धनंजय यांचे, मूळ लिखाण मिसळपाव डॉट कॉम वर http://www.misalpav.com/node/20487)