शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे ..

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारे !
आहे घरासचि असें गमतें मनांस
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !

एका आळसावलेल्या दुपारी, भरल्या पोटी डोळा लागल्यावर मी 'घरी' पोचलो. लांबुन जेंव्हा घर दिसले तेव्हा दारातली कण्हेर मला वाकुन पाहत होती आणि पारिजातकही तिच्यामागुन डोकावत होता. जसे घर जवळ आले तशी रांगोळी दिसली आणि दारात पोचताच दिसले आंब्याच्या पानांचे तोरण. आत शिरताच अगदी आतल्या खोलीतले .. बाहेरुनही थेट दिसणारे देवघर, तिथे तेवत असलेली समई आणि पोपटी पार्श्वभुमीवर लाल गेरुने काढलेली वेलबुट्टी.

स्वयंपाकघरातुन बाहेर पडल्यावर येणारा छोटासा चौक, समोरचा गच्चीवर जाणारा जिना आणि जिन्याखालचा हौद. हौदातल्या गारेग्गार पाण्याने तोंड खसखसुन धुतले आणि तसेच हातपायही धुतले की आपण थकलो होतो ही जाणिवही धुवुन जाते. मी ताजातवाना होतो. मोकळे ढाकळे घरातले कपडे घालुन मस्त विसावतो.

आता माझ्या हातात नेसकॉफीचा कप आहे, नुकताच तरुण भारत वाचुन झालाय आणि समोरुन लोकमत आणायला लहान्या भावाला पिटा़ळलेय. गणपतीबाप्पाच्या जोडीने घरात महालक्ष्मी आलीये. ओल्या नारळाच्या करंज्याचा खरपुस गोडसर वास मला मोहावतो, स्वयंपाकघरात कोणी नाही तो क्षण गाठुन एखादी करंजी उडवायचा बेत पक्का होतो. रिकामा कप ठेवायच्या निमित्ताने मी स्वयंपाकघरात शिरतो आणि जरासा घुटमळतो, तोच आज्जी दरडावते "आता मोठा झाला आहेस, उद्याच्या नैवेद्यासाठीचा प्रसाद आहे तो, उद्या मिळेल." मी हळुच तिथुन निसटतो.

आमच्या गौरींचे मुखवटे पितळी आहेत, दोन का असे विचारल्यावर, एक आईची आणि एक आज्जीची असे उत्तर मिळते. रांगोळीच्या पावलांनी लक्ष्मी येते, वाजतगाजत येते, एव्हाना ताम्हण वाजवायचे माझे काम लहान्या भावाकडे गेलेले आहे. देवींची यथासांग प्रतिष्ठापना होते.

उद्या लक्ष्मी घरी जेवणार, पंचामृत, कोशिंबीरी, कितीतरी भाज्या आणि गोडधोडाची रेलचेल उडणार. बरेच पाहुणे दुपारच्या जेवणाला असणार. आज्जी आणि आई रात्री उशिरापर्यंत काम करत राहणार, आणि उद्या पहाटे पहाटे उठणार. एव्हाना बेसनाचे, रव्याचे लाडूही वळुन झालेत ...

-----------------------------------------

कर्णकर्कश्य आवाजाने मी हडबडुन उठतो, दाण्णकण जमिनीवर आदळण्यावर झाल्यासारखी घाणेरडी फीलींग आलीये, आगीचा बंब भेसुर ओरडत जवळच्या हमरस्त्यावरुन चाल्लाय, मी कावराबावरा झालोय.  पॅटिओतुन डोकावतो, बाहेर विजांचा दणदणाट चाल्लाय, सिविअर वेदरचा अलर्ट कर्कश्य करवादतोय.

जाणवते, 'माझे घर' इथुन फार फार लांब आहे, त्या घरात आता आज्जी नाही, कोणीही नाही, ते घरही आता माझे नाही. आणि आज्जी तर आता नाहीच. ती नकोशी जाणिव मला परतवता येत नाही. हंबरडा फोडावासा वाटतो, पण मी तसाच थांबतो, घसा गोठुन दगडाचा होतो. न राहवुन मी शेवटी माझ्या छोट्याश्या देव्हार्‍यासमोर जाउन उभा राहतो, डोळे मिटतो. कोणतेही आर्जव करण्याआधीच दोन चिमुकले हात माझ्या पायांना धरुन उभा राहण्याची धडपड करतांना जाणवतात ...