रविवार, २९ जुलै, २०१२

हरवलेलं सुख ..

"रेहने को घर नही .. सोने के बिस्तर नही .. अपना खुदा है रखवाला ssssssssssss" अशी तान घेत मी बंद गेटवर धाडकन सायकल घातली, गेटची दोन्ही दारं मागं आपटुन वेगानं रिबाउन्स झाली, मला ते सवयीचं असल्यानं मी शिताफीने एक दार सायकलच्या पुढच्या चाकावर आणि दुसरे दार हातानी धरले .. सायकल व्हरांड्यात वाकडी पार्क केली, कॅरिअर आणि सीटच्या बेचक्यातले लॉक लाउन चावी काढली आणि घरात शिरलो. आजोबांनी लगेच "बबड्या गेट लाव आधी" म्हणुन उलटा पाठवला.

घरात आले की बुट काढायचे, दप्तर कप्प्यात ठेवायचे, दंड जागच्या जागी कोपर्‍यात उभा करुन ठेवायचा, हात पाय तोंड धुवायचे, घरातले कपडे घालायचे आणि देवासमोर पर्वचेला बसायचे हा रोजचा नियम. सातच्या बातम्या लागाण्याआधी बोर्नव्हिटा पिउन झालेला असायचा. मग आज शाखेत शिक्षकांनी कोणते कोणते खेळ घेतले, त्यात मीच कसा जिंकलो, बंड्या कापसे ला कसे लोळवले वैगेरे वर्णनं आईला तिखटमीठ लाउन सांगायची. कधेमधे छोटं मोठं खरचटायचं मग आई त्यावर हळद लावायची, मी आईला म्हणायचे बँड एड लाव, ती म्हणायची मोठं काही लागलं तर बँड एड लावतात, उगाच नाही. त्या काळात बँड एडच्या पट्ट्या नवीन आलेल्या होत्या, मला बँड एड लाउन वर्गात स्टाईल मारायची फार इच्छा होती.  बातम्या चालु असतांना गृहपाठ चालु झालेला असे. पाठ असल्या तरी आज्जी उगाचच कविता म्हणुन घेई. दादा ताईचा अभ्यास आधीपासुन चालु असे, त्यांच्या नेहमी दोनशे पानी वह्या असत. साडे आठ नउ पर्यंत मुलांची पहिली पंगत बसे. मला गरमा गरम तव्यावरची पोळी आवडे, मी आईला तवा पोळी वाढ असे म्हणे. आईजवळ कितीही तुपसाखरेसाठी हट्ट केला तरी ती देत नसे, चेहरा पडला की आज्जी तिच्या खास अधिकारात तुपसाखर वाढे :)

आजोबांचे जेवण झाल्यावर ते शतपावलीला मला त्यांच्याबरोबर घेउन जात, आमच्या गल्लीत मोठाले हॅलोजनचे पिवळे दिवे तेंव्हा लावलेले होते, दिव्याकडे पाठ करुन चालतांना त्यांच्या उंच धिप्पाड सावली बरोबर माझी बुटुक बैंगण सावली सावली चाले. आम्ही घरी जाउत तोवर निजायची तयारी झालेली असे, मी माझ्या आजोबांजवळ झोपायचा हट्ट करे. त्यांची धुवट सोलापुरी चादर मला फार आवडे. आजोबा मला नेहमी भिंतीच्या बाजुने झोपवीत. आजोबांच्या डोक्यावर आणि छातीवर पांढरे पांढरे केस होते आणि त्यांची त्वचा किंचित सुरकुतलेली होती. त्याकाळच्या माझ्या चेहर्‍याएवढा त्यांचा तळहात होता, तो मउ नव्हता .. पण रखरखीत पण नव्हता, त्यांच्या तळव्याची त्वचा जाड होती. त्यांच्या तळव्याच्या विरुद्ध बाजूच्या हातावर टप्पोर्‍या धमन्या उठुन दिसत, मला त्या ताकतीचे चिन्ह वाटे, मला त्यांच्याशी खेळायला मोठी मौज वाटे. मी त्यांना विचारे "आबू माझ्यात एवढी ताकत कधी येणार हो ?" ते म्हणत "तु सध्या फक्त पाचच सुर्यनमस्कार मारतोस ना .. जेव्हा दिवसाला एक्कावन्न मारायला लागशील तेव्हा होतील." मग ते मला मी तोवर कधीही न पाहिलेल्या पुण्याबद्दल सांगत, व्यायाम करायला ते पळत पर्वतीवर जात, तिथे किती जोर मारत, मग खाली आल्यावर बादशाही बोर्डिंग मध्ये दुध पित वैगेरे गोष्टी आम्हा सगळ्या भावंडांना माहिती झालेल्या असत. मला ते थोपटवुन झोपी घालायचा प्रयत्न करत, पण मी गोष्ट सांगा म्हणुन मागे लागलेला असे. आजवर शिवाजीच्या गोष्टी, रामाच्या अर्जुनाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगुन झालेल्या असत. मी नवी गोष्ट सांगा म्हणुन हट्ट करे. त्यांनी यावेळेस स्वातंत्र्यलढ्यातली एखादी गोष्ट निवडलेली असे, एव्हाना दादा ताई पण अभ्यास संपवुन आमच्या जवळ आलेले असत.

शेजार्‍या पाजार्‍यांचे दिवे बंद व्हायला सुरुवात झालेली असे, आजोबांच्या पलंगावर मी त्यांच्या मांडीवर डोके ठेउन कधीच झोपी गेलेला असे. स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट ताई दादा पुढे पुर्ण एकत असत..

हरवलेलं सुख ..