आई तेच ते गाणे म्हणुन थकली होती. मग कसतरी म्हणु लागली. तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला,
"तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली
आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?"
आई खुप चिडली होती.
"तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली
आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?"
आई खुप चिडली होती.
अगदी लहान असतांना अजाणत्या वयात अश्या अनेक घटना पहाणारं कोल्ह्याट्याचं पोर त्याचं आख्खं बालपण आईला तिच्या मायेला पारखं होतं. ज्यानं बाप हे नातं कधी पाहिलच नाही आणी ज्या घर नावाच्या जागेत तो लहानपणी राहिला तिथे पदोपदी (हो अक्षरशः पदोपदी ) त्याच्या वाटेला उपेक्षाच आली. ६-८ वर्षाच्या वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत, तमाश्यात नाचणार्या मावशीबरोबर फडावर राहुन पडेल ते काम करुन कमावलेल्या पैश्यात, पुढच्या वर्षीच्या अभ्यासाला लागणार्या पुस्तकांची खरेदी करण्याची स्वप्नं जेव्हा त्याचा सख्खा आजा एका रात्रीच्या दारुसाठी उधळुन लावतो तेव्हा त्या लहानग्या जिवाला त्याच्या वयाला न शोभणारे प्रश्न पडतात, त्याच्याकडे आपली आई आपल्याबरोबर रहात नाही हे एकच उत्तर असते. हे कोल्ह्याट्याचं पोर नंतर पुस्तकात जागोजागी आई भेटावी म्हणुन नवस करत रहातं. त्याचा देव त्याच्या आज्यासारखाच मुर्दाड होता जणु, कधी पावलाच नाही त्याला. त्याचं बालपण सगळं आईची वाट पहाण्यात अन घरातल्या एतखाउ पुरुषांचा मार खाण्यात गेलेलं. घरातली सगळी बायकांनी करण्याची कामं त्याच्या वाट्याला आलेली असायची. अगदी पाहुण्यांना जेवायला वाढण्यापासुन ते त्यांचे उष्टे खरकटे काढण्यापर्यंत.
त्याच्या आजुबाजुला सगळी आपापल्या वासनांना इच्छांना चटावलेली अन त्यांनाच अग्रक्रम देणारी अन आयुष्यात भावभावनांना फारसे स्थान नसणारी, आपल्या गरजा सोप्यात सोप्या मार्गाने पुर्ण करु इच्छिणारी माणसं होती. घरातले सगळे पुरुष म्हणजे लेकिंना अन बहिणींना नाचायला लावणारे, त्यांच्या पैश्यावर मालकी दाखवुन माज करणारे. त्यांना उत्पन्नाचे साधन मानणारे. एखादा माणुस त्यांच्या घरातल्या मुलीशी-बहिणीशी लग्नाला तयार जरी झाला तरी आधी त्याच्याकडनं आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करवुन घेणारे अन मगच पुढे जाउ देणारे दगड. त्यांना कुठेही किशोरच्या मेहनतीचे, अभ्यासातल्या यशाचे कौतुक वाटत नाही, अभिमान वाटत नाही. अन वाटेलही कसा अभिमान ? पैश्याच्या लालचीनं अन आयतं खाण्याच्या सवयीनं त्यांच्या अभिमानाचा जनु खुनच केलेला असतो.
अशा या सगळ्या वातावरणात वाढणारा, आईपासुन दुरावलेला एक उपरा पोर, नशिबाची सगळी दानं उरफाटी पडत असतांना जिद्दीने शिकतो, डॉक्टर होउन त्याच्या आयुष्याची लढाई लढतो अन जिंकतो पण !
गोड गोजिरी, पैश्याच्या राशीत लोळणारी, तुपात भिजवलेली डिझाइनर दु:ख पाहुन डोळे ओले करण्याची सवय लागलेल्या शहरी माणसाला हे कोल्ह्याट्याचं पोराचं अंगावर येणारं, सुन्न करणारं दु:ख सोसवत नाही, पेलवत नाही.
विजिगिषा हा शब्द तोकडा पडावा इतकी ... अक्षरश: इतकी ... चांगले जगण्याची, शिकण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती कोल्ह्याट्याचं पोर दाखवुन जातं!
आयुष्याला लढाईची उपमा द्यायला याहुन योग्य माणुस नसावा कदाचित !
किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!!
पुस्तकाचे नाव : कोल्ह्याट्याचं पोर
लेखक : डॉ. किशोर शांताबाई काळे
प्रकाशन : ग्रंथाली
किंमत : १०० रु.
टिपः डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे २० फेब. २००७ ला अपघाती निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा