रविवार, ४ एप्रिल, २०१०

हरवलेले सुख - वाढदिवस

"आई माझा वाढदिवस कधी येणार गं ?"

"अजुन दोन महिने आहेत रे" ते "आता उद्याच आहे ना" असा उत्तराचा प्रवास पुर्ण करत वाढदिवस एकदाचा येतो. अवचित एखाद्या वर्षी शाळेला दांडी मारायची पण मुभा असायची, दांडी मारायची नसेल तर आख्ख्या वर्गभर चॉकलेटे वाटायची गंमत मिळणार असायची. आधीपासुनच बाबांच्या मागे लागायचे "बाबा यावेळेस गोळ्या नाही हं वाटायच्या, आपण चॉकलेट आणुयात ना वाटायला !". गोळ्या म्हणजे साध्या आणी चॉकलेट म्हणजे भारी ही समजुत अगदीच पक्की. वर्गात चॉकलेट वाटुन संपल्यावर लक्षात यायचे की आपल्यासाठी चॉकलेट काही उरलेच नाहीये, रडवेला चेहरा पाहुन बाईंच्या ते लक्षात यायचेच, मग बाईंच्या वाट्याला आलेले चॉकलेट त्या लगोलग देउन टाकायच्या, नमस्कार केल्यावर पाठीवर हात फिरवायच्या. शाळा कधी परकी वाटलीच नाही.

परगावी कॉलेजात शिकणार्‍या ताईला स्वतःच्या हाताने लिहुन पत्र टाकलेले, पत्रोत्तर येणार की ताई येणार याचा विचार डोक्यात चालुच. शाळेतनं मधल्या सुट्टीतच घरी जाण्याची परवानगी मिळाल्याने आनंदाने घरी यायला निघायचे. वाढदिवसाच्या दिवशी अर्ध्या शाळेतनं घरी जायला मिळणे म्हणजे आनंदाची परमावधी. घरी पोचताच गेट धाडकन्न उघडुन घरात शिरतांना ताई घरात असल्याच्या पाउलखुणा जाणवायच्या, त्याचबरोबर यायचा तो घरी बनवलेल्या गोडसर खरपुस केकचा सुगंध. "तु पत्राला उत्तर का नाही पाठवले ?", "तु इतक्या उशिरा का आलीस ?" वैगेरे प्रश्न कुठल्या कुठे गायबलेले, स्वयंपाकघरात शिरल्यावर ताई पट्ट्कन कडेवर उचलुन घेते. मोठ्या तरसाळ्यात आधी तयार करुन ठेवलेले दोन केक ती दाखवते, तिसरा गॅसवर असतोच. "बाप्परे तीन तीन केक !!" म्हणुन माझा चेहरा फुललेला. स्वयंपाकघरात गॅसवर तवा, तव्यावर वाळु अन त्यावर ते अल्युमिनिअमचे केकचे भांडे. ताई इकडे दुधाच्या पिशवीचा कोन करुन त्यात तुपसाखर भरण्यात गर्क. आता ती केकवर त्याने लिहणार "भय्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा", छान वेलबुट्टीची नक्षी पण काढणार. मला स्वर्ग दोन बोटे उरलेला. "माय मरो मावशी उरो" म्हणतात, ताईसाठी अशी म्हण तयार नसली झालेली तरी "ताई" आणी "आई" या शब्दातच फारसा फरक नाहीच, यातच सगळे आले. तीची माया मायेसारखीच, तिला उपमाच नाही.

एव्हाना संध्याकाळ झालेली काका, मावश्या, चुलत-मामे-मावस भावंड यायली सुरुवात झालेली, त्यांच्याबरोबर घरात रंगेबिरंगी चमकीच्या कागदात गुंडाळली पुडकी पण शिरलेली. माझा आनंद आणी उत्साह शिगेला पोचलेला. मीही ठेवणीतला ड्रेस घालुन छान तयार झालेलो. शेवटचा हात ताई फिरवणारच्,थोडा तेलाचा हात डोक्यावर फिरतो, ती चापुनचोपुन माझा भांग पाडते, मी नको नको म्हणुन झटापट करत असतांनाही ती हलकासा पावडरचा पफ फिरवतेच. मी तयार. आता गल्लीतली तसेच शाळेतलीही काही मित्रमंडळीह आलेली. वाढदिवसाचा स्टँडर्ड टाईम "७ वाजता" जवळ आलेला, मी केक कापण्यासाठी उतावीळ. बाबा काका लोकांचे नावडते काम फुगे फुगवणे संपत आलेले, ताई दादातली घराची सजावट रंगेबिरंगी पट्ट्या वैगेरे पुर्ण झालेली. बच्चेकंपनीचा फुल्ल धिंगाणा चालु असतो, क्वचित एखाद्या दोघांची जुंपलेली पण असते. आता केक कापण्याचा प्रोग्राम सुरु व्हायला हवा याचा अंदाज आता मोठ्यांना पण येतो.

घरात मध्यभागी एक टेबल ठेवले जाते, त्यावर एक टेबलक्लॉथ, त्यावर छान सजवलेला केक मध्यभागी ठेवला जातो. मेणबत्ती मध्यभागी लावली जाते, "फुंकायची नाही हं" वर असेही सांगितले जाते. हॅपी बड्डे टु यु च्या मराठी गजरात केक कापला जातो, मलाही भरवला जातो. ताई लगोलग केकचे तुकडे करायला घेते. आता एकेकजण येउन "हॅपी बड्डे" म्हणुन काही ना काही गिफ्ट देउन जात असतो. लगेच उघडुन पहाणे काही शक्य नाही हे माहित असते. एक लहानगा जवळचा मित्र, राजु शेख, हातात जमा केलेली चिल्लर ठेवतो, आठवतेय तशी आजवर मिळालेली आयुष्यातली सर्वोत्तम गिफ्ट असावी ती.

बच्चेकंपनी आणी मोठेलोक पण चिवडा-लाडू-केक खाउन, फुगे घेउन घरी जातात. आता घरात सगळे जवळचे नातेवाईक. ताई दादा आणि मी आलेल्या गिफ्ट उघडुन पहाण्यात मग्न. नुसता आनंद. रात्रीची जेवणं गच्चीवर करायची ठरतात. गच्चीवर लाईट लावला जातो, ताई गच्ची झाडुन काढते, पाणी शिंपडते. गच्चीवर जेवणं पार पडतात.

एव्हाना मी झोपायळलेला असतो. काकवा-मावश्यांन्या त्यांच्या आपापल्या घरी जायचे असते, भावंड पण झोपायला आलेली असतात. देवघरासमोर रांगोळी काढुन पाट ठेवला जातो, डोक्यावर टोपी ठेवुन सगळ्याजणी मला औक्षण करतात. उदंड आयुष्याची शाश्वती तिथेच झालेली असती.

आठवणींच्या या रमलखुणा मला आजही मोहवतात, आजचाही आनंद उद्या मोहावेल, आठवणींच्या रुपाने तो शाश्वत राहील.

धन्यवाद !