नवा नंबर तुला कळवावा की नाही या विचारातच मला डोळा लागावा अन मी येउन पोहचावा स्वप्नांच्या धुसर निळसर आभासी जगात ! आता एरवी मला अप्राप्य अशी तु अगदी हाताच्या अंतरावर येउन पोहचावी. तुझ्या हातात असावी एक सुरेख शुभ्र हस्तिदंती लहानशी पेटी. तु त्या पेटीला माझ्याकडे पाहुन मला लक्षात येईल असे हृदयाशी कुरवाळावे अन कुतुहलाने मी दंग होत जावा. स्मृती जागी व्हावी अन आठवावा कुठल्यातरी दुकानात त्या पेटीसाठी तु केलेला हट्ट .. हो तीच ती ! माझ्या चेहर्यावर ओळखीचे स्मित उमटावे, तुलाही त्याच आठवणीची मला लागलेली ओळख पटुन तुही हर्षभरीत व्हावीस.
त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे. आपल्यासाठीचा हळुवार, खोडकर तरी कधी टोचणार्या आठवणींचा खजिना ! त्या पेटीतला तो एवज पाहुन माझे मन आनंदाने उचंबळुन यावे.
आता हाच आपला संपर्क असे जणु तुला सुचवायचे असावे. तु अबोलच रहावीस अन अबोलच गुप्त व्हावीस त्या आठवणींचा खजिन्यासकट.
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !