शुक्रवार, १६ मे, २००८

उन पाउस

कधीतरी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी कथेचा हा स्वैर अनुवाद ...

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं निघालेली एक्सप्रेस यथावकाश मुंबईचा कोलाहल सोडुन सह्याद्रीच्या कुशीत शिरली. गार मोकळ्या वार्‍याने प्रवासी छान सुखावले, कुणी मासिकं-वर्तमानपत्र वाचु लागले तर कुणी बसल्या बसल्या पेंगु लागले. गाडी अगदी सगळ्या प्रकारचे-वयाचे लोक पोटात घेउन धावत होती, तरीही बहुतांश प्रवासी नोकरदार वर्ग किंवा महाविद्यालयीन तरुण तरुणी होते.

त्या कंपार्टमेंटमधे खिडकीजवळ साधारण साठीचा एक शिडशिडीत वयस्क गृहस्थ त्याच्या जवळपास तिशीच्या मुलाबरोबर बसला होता. म्हातारा मोठा टापटिप होता, चेक्स चा हाफ शर्ट व्यवस्थित ईन केलेला डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा वयाला साजेसा संथपणा असा मोठा ऐटीत बसला होता. पोरगा मजेत पण किंचीत बालिश नवथरपणे खिडकीतुन बाहेर बघत बसला होता.

पावसाळ्याचे दिवस होते. जशी गाडी लोणावळा-खंडाळा परिसराच्या नयनरम्य निसर्गाने नटलेल्या परिसरातुन जाउ लागली तसा त्या तिशीच्या पोराचा उत्साह ओसंडुन वाहु लागला, डोंगर दर्‍या, जागोजागी वहाणारे लहान मोठे धबधबे अन निसर्गाची हिरवीकंच दौलत पाहुन तो हरखुन मोहरुन गेला.

"बाबा .. ओ बाबा .. ऐका ना .. ते काय हातात धरुन बघताय तुम्ही .. इकडे बघा ! .. ही कशी झाडं सगळी मागे पळतात बघा ना ! हिरवा रंग किती सुंदर आहे नं .. अस वाट्टय इथच खाली उतरुन नुसते हे डोंगर दर्‍या बघत बसावेत ... नाही ?"
हे ऐकता ऐकता बाप सुद्धा हातातला पेपर ठेवुन, पोराबरोबर बाहेरची सिनरी पहाण्यात रमला.

आजुबाजुच्या लोकांना त्याचे असे वागणे विचित्र वाटायला लागले. प्रत्येकजण चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहुन आपल्या बरोबरच्या सहप्रवास्याबरोबर त्याच्याबद्दल काही ना काही खुसफुसत बोलायला लागला.

"हा येडा दिसतोय !" समोरच बसलेला अनुप त्याच्या नववधुला म्हणाला.

इतक्यात पावसाला सुरुवात झाली अन पावसाचे तुषार आत बसलेल्या प्रवास्यांवर खिडकीतुन पडायला लागले. थोडे उन थोडा पाउस असे मोठे विहंगम दृष्य पाहुन तिशीच्या पोराच्या आनंदाला पारावार उरला नाही, ताठ होउन भान विसरुन तो पावसाला पहात होता. अत्यानंदाने त्याने दोन्ही हातांनी गजांना घट्ट धरुन ठेवले होते. भावनातिरेकाने तो शहारला, त्याच्या हातावरची लव उभी राहिली, त्यावरच्या चकाकणार्‍या पाण्याच्या थेंबांचे डवरुन उठलेले मोती पहावे का बाहेर सुर्यास्त होतांना ढगांच्या कडांवर विसावलेले इंद्रधनुष्य पहावे अश्या विचारात तो बेभानपणे आलटुन पालटुन दोन्ही दृष्य नजरेत साठवुन घेत होता.

इकडे अनुपची वधु तिचा नवा ड्रेस पावसाच्या थेंबांनी खराब होत होता म्हणुन वैतागली होती. तिने एक रागिट कटाक्ष अनुपकडे टाकला.

अनुप शेवटी वैतागुन म्हणाला,"अहो काका, पाउस पडतोय हे दिसत नाही का तुम्हाला ? तुमच्या मुलाला बरे वाटत नसेल तर त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलात नेउन टाका ना ! प्लिज अजुन त्रास नका देउ आम्हाला !"

म्हातारा थोडासा पुढे झुकला अन हळु आवाजात म्हणाला,

"श्श्श .. ! "
"आत्त्ता आम्ही हॉस्पिटल मधुनच परत येतोय, माझ्या मुलाला सकाळीच डिस्चार्ज मिळालाय, तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा."

तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.




हे लिखाण मिसळपाव वर पुर्वप्रसिद्ध.
या लेखाला मिसळपाव वर मिळालेले प्रतिसाद पहा.