बुधवार, १६ एप्रिल, २००८

आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे ..




तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु.


तुला आठवतो का ग आपला एखादा प्रवास ? मला खिडकीचीच जागा हवी म्हणुन हट्ट असायचा तुझा, अन जागा मिळाल्यावर काय तो ओसंडुन वहाणारा आनंद. गाडी हलली - जssरा गार वारा लागला की बोलता बोलता आपसुक डोळे मिटायचे तुझे आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे. खाचखळग्यात झटका बसुन तुझे डोके पुढे आदळु नये म्हणुन दुसर्‍या हाताने मी तुझ्या हनुवटीला अलगद आधार देउन ठेवायचो. भुरभुर उडणारे तुझे केस माझ्या कानाला, गालांना गुदगुल्या करायचे आणी मग शेवटी न रहावुन मी त्यांना सावरायचा प्रयत्न करायचो, या सगळ्यात तुझा डोळा उघडायचा आणी मग तु मला रागे भरायचीस,


"काय रे! दोन मिनीटे काही जिवाला शांत बसु देणार नाहीस, आत्ता कुठे थोडा डोळा लागला होता तर ...".असं थोडं काही मनाविरुद्ध झालं की लगेच रुसायचीस तु, गाल फुगवुन बसायचीस आणी दोन मिनीटात बाहेरची गम्मत जम्मत पाहण्यात रमुन पण जायचीस. माझ्या हाताला लागलेली कळ कधी लक्षात आली होती का ग तुझ्या ?



हा आणी असेच कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवुन गेलीस तु, अशाच एका एका प्रवासात अलविदा म्हणालीस अन नव्या प्रवासाला निघुन गेलीस नव्या दिशेला. तुझा तो अलविदा कळायला मला जरा उशीरच झाला. माझा तर प्रवासच खुंटावला आणी दिशा पण हरवल्या, जसा झोकात उडणारा एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा.



आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे
दुनिया ने फिर न पूछा, लूटा है मुझको कैसे
न किसी का साथ है, न किसी का संग
मेरी ज़िंदगी है क्या.............

बुधवार, २० फेब्रुवारी, २००८

हज़ारों ख्वाहिशें ऐसी ......


मी मनात तो विषयच येउ देत नाही,अगदीच मनाचे सगळे बंध तोडुन आला जरी; तरी दुर ढकलुन देतो मी त्याला, अगदी दुर. अन तरीही त्रास होत राहीला तर मग मी जप करतो, पुस्तके वाचतो.

खरे तर मी तिच्या अस्तित्वालाच नकार दिलाय..... तरीपण स्वप्नाच्या अन सत्याच्या धुसर सीमेवर ती मला भेटतच रहाते ... वेगवेगळ्या रुपातुन .. कधी सहचारिणी बनुन तर कधी अभिसारिका बनुन. कधी रागावते ओरडते तर कधी काळजी घेते, माझ्या जखमांना औषध लावते. कधी त्याच्या बरोबरच्या प्रेमाच्या सुरस गोष्टी मला सांगते अन मला स्वप्नातल्या जिवंतपणी उभा जाळते. मी खडबडुन उठतो .. तोंडावर पाणी मारतो अन तयार होतो खर्‍या खर्‍या जगातल्या खोट्या खोट्या आयुष्यात जायला .. स्वप्न कोणते असते तेच समजत नाही!! जागेपणी जगतो ते का झोपल्यावर अनुभवतो ते ? अजुन अशा बर्‍याच गोष्टींचा थांगपत्ता लागायचाय.

तसेच तुझे अचानक जाणे. रणरणत्या उन्हातुन थंडगार पाण्याचा माठ भरुन आणावा अन सावलीत आल्याआल्या कोणीतरी टचकन त्याला खडा मारुन फोडुन टाकावा, आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! असे काहीसे तुझे जाणे. तु गेलीस हे मात्र खरे, अगदी कायमची गेलीस माझ्या आयुष्यातुन. अशी गेलीस की कधी होतीस का नव्हतीस असा प्रश्न पडतो मनाला. तुझ्या असण्याचे हजार पुरावे असतात अवतीभोवती, सगळ्यांना खोटे ठरवण्याची कारणं शोधता शोधता माझीच ओळख विसरायला होते कधी कधी.

हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले ।
निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन,
बहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकले ।

- आनंदयात्री

गुरुवार, १० जानेवारी, २००८

वक्त को रोकने को जी चाहता है.



परवा एक जुनी मैत्रीण भेटली खुप दिवसांनी. लांबुन दिसली तेव्हा वाटले की किती बदलली आहे ही !! आज किती दिवसांनी भेटुत तेव्हा कसे वाटेल वैगेरे वैगेरे.
काही क्षणातच तिच्या समोर उभा होतो मी. जणु काही बदललेच नव्हते आमच्या दोघात. जणु काही आत्ता काल परवाच भेटलो होतो आम्ही.
सहजच शब्द निघुन गेले, मी विचारले, "माउ हे सगळे लोक एवढे आनंदी कसे असतात ग ?"
तिने चमकुन माझ्याकडे पाहिले ....... दोन टप्पोरे मोती तिच्या गालांवरुन ओघळले ....... काही क्षण स्तब्ध राहिली अन म्हणाली "चल निघते मी आता, जायला हवे."
माझं आनंदाच झाड आज अश्रुंनी डबडबलं होतं. अन मान खाली घालुन झराझरा निघाली सुध्धा. मी निमुटपणे बघत होतो, तिची लांब लांब जाणारी पाठ्मोरी आकृती जमेल तितकी नजरेत सामाउन घेत होतो.

कोणी तरी अनाम गायक गात होता---
बडे उतावले थे यहा से जाने को,
ज़िन्दगी का अगला पडाव पाने को...
पर ना जाने क्यो..
दिल मे आज कुछ और आता है,
वक्त को रोकने को जी चाहता है.

सोमवार, ३ सप्टेंबर, २००७

लग्न

असच एखाद्या दिवशी असेल धो धो पाउस
आणी तू न मी असुत सिंहगडावर
भिजलेले असुत चिंब आपण
आणी गोठलेले असतील शब्द सुद्धा

वारा मग धरेल अंतरपाट आपला
अन आकाश करेल तुझे कन्यादान
तिथेच होईल सप्तपदी आपली
आणी गारांच्या असतील अक्षता

झोकून देऊ हे शरीर मग
उंच कड्यावरुन एखाद्या
सोपवून देऊ मग सगळे काही
चिरंतन अविनाशी मृत्यूला

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २००७

श्रावणझड

आजूबाजूला ... इकडेतिकडे .... सगळीकडे

तुझ्याच आठवणी पसरलेल्या

तुझी डायरी, तुझे पेन

तुझा डेस्क अन बरेचसे असे तुझे काही

प्रत्येक गोष्टीकडे पाहताना ...

येणारा प्रत्येक संदर्भ तुझाच

अन त्या संदर्भाबरोबर येणारी आठवणीची श्रावणझड

माझीच ......... फक्त माझीच

बुधवार, २९ ऑगस्ट, २००७

देवगांधार

ओळख बरं आज सकाळी मी कोणाला पाहिले ??

पोपटी रंगाचा ड्रेस घातलेला ... मनात प्रश्नांचे, विचारांचे काहुर माजलेले... एक हात सतत पर्स वर ठेवलेला ... दर मिनिटाला मनात इच्छा ... देवा फोन येउदे, फोन येउदे .... टेलेफोन ओफ़िस समोरुन एकटेच माझे आनंदाचे झाड चालत येत होते ...

एक नजर पहिले अन मनत देवगांधार उमटला ... असा देवगांधार जो कोणी ऐकलेला नाही ... मग मनात उमटत होते ते काय आहे ... कोणतीतरी .. जणु सात जन्म जुनी एक जाणिव सांगत होती .. हाच तो सुर जो तुला आजपर्यंत गवसला नव्हता ... देवगांधार ... अन इकडे माझे आनंदाचे झाड एकटेच चालत येत होते ...

अंतर हळुहळु कमी होत होते ... मनात हुरहुर दाटली होती ... देवगांधार धुंद करत होता ...
मी बाजुला झालो ... माऊ अगदी हाकेच्या अंतरावर आली ... असे वाटले सरळ पुढे जावे अन माझ्या वेड्या कोकराला मिठित घ्यावे ... पण कोणजाने कशाने बांधुन ठेवले होते मला ... ते आरसपानी सौन्दर्य नजरेत भरले अन निमुटपने चालता झालो ...

देवगांधार खुंटला .. गाड्यांचे कर्कश्श्य होर्न कानात घुमले .... वळुन पाहिले तर ... पोपटी रंगाचा ड्रेस घातलेले माझे आनंदाचे झाड एकटेच चालले होते .. माझ्याकडे पाठ फ़िरवुन ....