रविवार, २२ जानेवारी, २०१२

मला आवडलेली कविता - गुरफटलेली आसवे

शनिवारच्या सुट्टीची दुपार नुसती झोपून आंबवलेली असावी, अगदीच अंधारुन आल्यावर .. कातरवेळही गडद झाल्यावर तुम्ही जडावल्या डोळ्यांनी उठावे आणि वाचनात ही कविता यावी .. गुरफटलेली आसवे

यशस्वी ललित लेखनाची टेस्ट काय असावी ? कमी शब्दातली मांडणी ? कमी शब्दातली अर्थवाही मांडणी ? हां अल्पाक्षरत्व ! हीच खरी ललिताची टेस्ट .. वाचकांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फोडणारी .. दिर्घकाळ जिभेवर चव रेंगाळवणारी रचना .. ललित म्हणजे अशी जादू की जी प्रत्येकाच्या मनात, एका युनिक, वेगळ्या कथेचा रंगमहाल उभा करते .. जो ज्याच्या त्याच्या अनुभवांच्या आणी मानसीच्या चित्रकाराच्या ताकतीनुसार कमी अधिक रंगीत, गुढ, भव्य असावा .. असेलही कदाचित. असे ललित, ज्यात एखादे कथाबीज बेमालुम लपवलेले आहे, माझ्या मनात परिकथेतल्या आकाशापर्यंत पोचणार्‍या झाडासारखे सरसर मोठे होते. जादूई रंगमहाल उभा करते. या फक्त चार ओळीच्या कवितेत ही ताकत कशी आली असावी याचे कोरडे विवेचन करण्यापेक्षा माझ्या जादूई रंगमहालातले एक दार इथे किलकिले करतो ..

कवितेच्या पहिल्या वाचनातच कविता किती अर्थवाही आहे याची ताकत यावी. माझे डोळे पुनर्वाचनासाठी पुन्हा पहिल्या ओळीवर स्थिरावले. चित्रदर्शी ... हो निखळ चित्रदर्शी पहिल्या दोन ओळी. या ओळीतच मानसीच्या चित्रकाराला भलामोठ्ठा कॅनव्हास मिळावा आणी त्याचे कुंचले सरसर फिरायला लागावेत.

काळोखात आसवे आपली
दिली-घेतली, गुरफटलेली.


अंधार्‍या शयनगृहात, एकमेकांवर निरातिशय प्रेम करणारे दोन जीव एकमेकांच्या मिठीत गुरफटलेले असावेत. कसल्या अज्ञात कारणाने ते एकमेकांपासुन दूर होणार असावेत आणि त्या जाणिवेने होणारा आर्त अश्रूपात दोघांनाही अनावर असावा. कदाचित अंखंड चुंबनाच्या वर्षावात ... किंवा भिजलेल्या चेहर्‍याच्या जवळीकीने एकमेकांची आसवेही एकमेकात मिसळून जावीत. प्रेमाच्या या अत्युच्च उत्कट अनुभुतीवर स्वार त्या जोडप्याला आपल्या आसवांच्या मिलनाची ओढ जाणवावी, दूर जाणे बिकट होत जावे आणि एकाने जीवाने दुसर्‍याला विचारावे ..

कोणती तुझी? कळलेच नाही.
माझी ओळखलीस का, तूही?


कोणती आसवे तुझी ? मला कळलेच नाही. तुला माझी आसवे ओळखता येतात ? का तुही तिथेच पोचली आहेस जिथे मी आहे ? (मला कळलेय की आता आपण एकमेकांचे इतके झालो आहोत की आपल्या आसवांनाही एकमेकांची ओढ आहे, तेही एकमेकांत इतके बेमालूम मिसळतात की वेगळे करणे अवघड व्हावे. आसवांची ही कथा तर तू आणि मी वेगळे होण्याची काय कथा ..)

------

ब्राव्हो धनंजय .. ब्राव्हो !!

(श्रेयअव्हेरः वर पहिल्या परिच्छेदात नमुद केल्याप्रमाणे कवितेचे श्रेय धनंजय यांचे, मूळ लिखाण मिसळपाव डॉट कॉम वर http://www.misalpav.com/node/20487)

शनिवार, १७ डिसेंबर, २०११

बोलती पुस्तके

संस्कृतीच्या अर्वाचीन खुणांबरोबरच साहित्याच्याही खुणा सापडतात. लिखित स्वरुपात नसेल तेव्हा मौखिक स्वरुपात होते त्याही आधी प्रथा, कथा, दंतकथा, गोष्टी अश्या स्वरुपात असावे. औद्योगिकरणाच्या शतकात उदयास आलेली आणि माणसाचे आयुष्य आमुलाग्र बदलणारी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी. यथावकाश इलेक्ट्रिसिटीवर चालणारी अनेक उपकरणे उदयास आली. ध्वनीमुद्रण म्हणजेच व्हॉईस रेकॉर्डिंग हा सुद्धा यांतला एक महत्वाचा शोध. १९३० पासुन शाळा कॉलेजांत, सार्वजनिक ग्रंथालयात ध्वनीमुद्रित रेकॉर्ड्स उपलब्ध असल्याचे समजते. पहिले बोलते पुस्तक म्हणजे ऑडियो बुक (Audio Book) इसवी सन १९०० मध्ये उपलब्ध असल्याचे समजते. नंतरच्या काळात अंधांसाठी १९३१ मध्ये अमेरिकन काँग्रेसने 'अमेरिकन फाउंडेशन फॉर ब्लाईंड्स' या संस्थेच्या मदतीने ऑडियो बुक्सचा एक मोठा प्रकल्प राबवला. हा प्रकल्प ऑडियो बुक्स्च्या विकासातला मैलाचा दगड असावा. १९८० च्या सुमारास व्यावसायिक स्वरुपात ऑडियो बुक्स बाजारात उपलब्ध आणि प्रसिद्ध होती.

आजच्या इंटरनेटच्या युगात ऑडियो बुक्ससाठी व्यावसायिक स्तरावर अनेक माध्यमं, संस्थळं उपलब्ध आहेत. लिब्रीवॉक्स (LibriVox) हा प्रकल्प विशेष उल्लेखनीय आहे. हा प्रकल्प म्हणजे प्रताधिकार मुक्त ऑडियो बुक्सचे डिजीटल ग्रंथालय आहे. इथे उपल्ब्ध असलेली ऑडियो बुक्स एकण्यासाठी तुम्हाला मुक्तपणे डाउनलोड करुन घेता येतात (mp3). २००५ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प २००७ पासुन सगळ्यात वेगाने वाढणारा प्रकल्प आहे, म्हणुनच लिब्रीवॉक्स हा ऑडियो बुक्सचा अत्यंत नावाजलेला प्रकाशक असावा. आजच्या घडीला इथे सुमारे ३३ भाषांमध्ये ५००० ऑडियो बुक्स उपलब्ध आहेत. यांतली बहुतांश पुस्तकं ही स्वयंसेवी माध्यमातुन ध्वनीमुद्रित केली गेली आहेत. याच पद्धतीने सरासरी दरमहा सुमारे ९० पुस्तके इथल्या खजिन्यात वाढतात.


खरी आनंदाची गोष्ट म्हणजे मराठीतही असा प्रकल्प सुरु आहे. 'बोलती पुस्तकं' हे अत्यंत गोंडस नाव घेउन सुरु झालेला हा प्रकल्प अगदी असाच, म्हणजे लिब्रीवॉक्स सारखाच चालतो. व्यवसायाने संगणक अभियंता असलेल्या श्री. आनंद वर्तकांनी २००९ च्या जानेवारीत हा प्रकल्प सुरु केला. बोलती पुस्तकेंची ओळख त्यांच्या शब्दात,

आजच्या धकाधकीच्या जगात आपल्यासारख्या "खाऊन-पिऊन सुखी" माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे फावला वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांसाठी यातली एक गोष्ट असते पुस्तकवाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार?

पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं"!

इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांच्या बोलत्या आवृत्त्या उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं यांची कथाकथनं वगळता). यासाठीच आम्ही हा बोलत्या पुस्तकांचा खटाटोप आरंभला आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. आणि आमची सर्व बोलती पुस्तकं ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत, अगदी चकट-फू! तुम्ही ती इथे ऐकू शकता किंवा "डाऊनलोड" करून तुमच्या mp3 player वर.

आता तुम्हाला पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वैपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही पुस्तकं ऐकू शकता. (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!)

++अधिक वाचा++

या प्रकल्पाला आपण सगळ्यांनी यथाशक्ती हातभार लावावा असे आवाहन इथे मी करु इच्छितो. ही मदत प्रताधिकार मुक्त पुस्तकांचे ध्वनीमुद्रण किंवा त्यांच्या स्कॅन कॉपीज उपलब्ध करुन देणे या प्रकारात असु शकते. या संदर्भात boltipustake@gmail.com इथे तुम्ही संपर्क साधु शकता. मराठीतली साहित्यसंपदा सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असावी हा अत्यंत स्तुत्य हेतु बाळगुन सुरु झालेला हा कौतुकास्पद प्रकल्प यशस्वी होणार अशी मनोमन आशा मी बाळगुन आहे.

-
आनंदयात्री

(ऑडिओ बुक्सबद्दलचे संदर्भ विकिपिडीआवरुन घेतले आहेत.)

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

रानफुल

रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो
तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा

मंतरलेल्या रानात रानफुल आणी मी
बघत होतो, प्रतिबिंबं, आमच्याच डोळ्यात तरारलेली

"तू आणि मी, आपण दोघं सारखेच !"
उमलतो पण गंधाला पारखे.
रानफुल सुखावलं ..

रानफुल सुखावलं तेव्हा दिसली होती,
माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार.


रानफुलं रानातच उमलतात .. फुलतात ..
असे म्हणत एकेदिवशी, मी परतलो .. जनरितीनुसार.

जातांना फुल म्हणाले होते, सुकले तरी चालेल,
पण ठेवशील ना मला डायरीत ? .. जनरितीनुसार ?

रविवार, २२ मे, २०११

शाप

माझ्याच जवळच्या माणसाने माझ्या मनाच्या हळव्या-दुखर्‍या वर्मावर वार केल्यावर..... यथावकाश मी अंतर्मुख झालो. या सगळ्या वेदनांचे पुढे काय होत असेल ? त्या कुठे जात असतील ?

माझ्या मनाच्या भिंतींवर, जागोजागी लटकणारी चित्रं मला आठवली.. त्यातली कुरुप बीभत्स चित्रं उघडीनागड्या लावसटींसारखी माझ्यावर धावुन येत होती, जणु त्यांचेच अस्तित्व त्या चार भिंतीत राज्य करते असे ठसवायचा प्रयत्न करत होती. वेदनांची अशीच कुरुप चित्रे होत असावीत. त्रस्त भिंतींनी या बटबटीत चित्रांना फिकट करायची विनवणी करत रहावी आणि त्या चित्रांनी भिंतींच्या हतबलतेवर कृरपणे खदाखदा हसावे.

त्या चित्रांवरच्या वेडावाकड्या रेघोट्या दरवेळी वेगवेगळी भाषा बोलतात, नवा अर्थ लावायला भाग पाडतात. त्यांचा उन्मत्त भडकपणा भिंतींना कोळपुन टाकतो, अव्ययाहत कोळपल्याने भिंतीनी तरी बेदरकारीचे पापुद्रे का धरु नयेत ? त्यांचा हिरवा रहाण्याचा अट्टहास दमछाक करवतो, थकवतो आणि कणाकणाने झिजवतो. अपेक्षाभंगाच्या जाणीवा, पराभूत होण्याची भिती यातून नवी चित्रे हळूहळू आकार घेतात. त्यांनाही वाचण्याचा आणि अर्थ लावण्याचा शाप माझ्या भाळी गोंदलेलाच असावा.

-
आनंदयात्री

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

काहीबाही.. (२)

तु गेलीस तसे, रस्त्यावर, ते कागदाचे कपटे माझ्याभोवती फेर धरुन नाचतात, सरळ अंगावर येउन जर्राशी लगट करुन भुर्रकन उडून जातात. जग जणु मुके होते, काळ थांबतो आणि तलम प्रकाशाच्या पडद्यातुन आठवणी झिरपतात.

------------------------------------------------------------------------------------------------------------

अजुन रामप्रहर आहे, पहाटच्या अंधारात जुईची फुले म्हणजे .. जणु रातभर आकाशी विहरुन क्लांत झालेल्या तारका जमीनीवर विश्रांतीला उतरलेल्या असाव्यात. मी एकेकीला कवेत घेण्याचा प्रयत्न करतो तसे त्यांचे अश्रू माझे हात ओले करतात. मी त्यांना पहाटचे दव असावे म्हणुन विसरण्याचा यत्नात भिजुन जातो.

------------------------------------------------------------------------------------------------------------

भुरभुरते केस .. सुरावटींचे अविष्कार आणि गुलजार .

हसुन ती मला म्हणाली .. मी तुला आवडते का रे ? मी म्हणालो .. आवडते ?? तुझा सहवास म्हणजे काव्यानुभुती !!

तिला मी त्या दिवशी म्हटले आठवणी कधी चिरंतन असतात का ग ? मग मी का नेहमी तु समोर असतांना तुझ्या आठवणीत असतो ? शेवटी हा आठवणींचा अतार्किक आलेख गुंडाळुन मी तिला म्हटले,

कसे व्हावे जगणे अवघड
कश्या व्हाव्यात वाटा धुसर
कसा पडावा त्रैलोक्याचा विसर
आणि चालावा फक्त आठवणींचा जागर ..

रविवार, ४ एप्रिल, २०१०

हरवलेले सुख - वाढदिवस

"आई माझा वाढदिवस कधी येणार गं ?"

"अजुन दोन महिने आहेत रे" ते "आता उद्याच आहे ना" असा उत्तराचा प्रवास पुर्ण करत वाढदिवस एकदाचा येतो. अवचित एखाद्या वर्षी शाळेला दांडी मारायची पण मुभा असायची, दांडी मारायची नसेल तर आख्ख्या वर्गभर चॉकलेटे वाटायची गंमत मिळणार असायची. आधीपासुनच बाबांच्या मागे लागायचे "बाबा यावेळेस गोळ्या नाही हं वाटायच्या, आपण चॉकलेट आणुयात ना वाटायला !". गोळ्या म्हणजे साध्या आणी चॉकलेट म्हणजे भारी ही समजुत अगदीच पक्की. वर्गात चॉकलेट वाटुन संपल्यावर लक्षात यायचे की आपल्यासाठी चॉकलेट काही उरलेच नाहीये, रडवेला चेहरा पाहुन बाईंच्या ते लक्षात यायचेच, मग बाईंच्या वाट्याला आलेले चॉकलेट त्या लगोलग देउन टाकायच्या, नमस्कार केल्यावर पाठीवर हात फिरवायच्या. शाळा कधी परकी वाटलीच नाही.

परगावी कॉलेजात शिकणार्‍या ताईला स्वतःच्या हाताने लिहुन पत्र टाकलेले, पत्रोत्तर येणार की ताई येणार याचा विचार डोक्यात चालुच. शाळेतनं मधल्या सुट्टीतच घरी जाण्याची परवानगी मिळाल्याने आनंदाने घरी यायला निघायचे. वाढदिवसाच्या दिवशी अर्ध्या शाळेतनं घरी जायला मिळणे म्हणजे आनंदाची परमावधी. घरी पोचताच गेट धाडकन्न उघडुन घरात शिरतांना ताई घरात असल्याच्या पाउलखुणा जाणवायच्या, त्याचबरोबर यायचा तो घरी बनवलेल्या गोडसर खरपुस केकचा सुगंध. "तु पत्राला उत्तर का नाही पाठवले ?", "तु इतक्या उशिरा का आलीस ?" वैगेरे प्रश्न कुठल्या कुठे गायबलेले, स्वयंपाकघरात शिरल्यावर ताई पट्ट्कन कडेवर उचलुन घेते. मोठ्या तरसाळ्यात आधी तयार करुन ठेवलेले दोन केक ती दाखवते, तिसरा गॅसवर असतोच. "बाप्परे तीन तीन केक !!" म्हणुन माझा चेहरा फुललेला. स्वयंपाकघरात गॅसवर तवा, तव्यावर वाळु अन त्यावर ते अल्युमिनिअमचे केकचे भांडे. ताई इकडे दुधाच्या पिशवीचा कोन करुन त्यात तुपसाखर भरण्यात गर्क. आता ती केकवर त्याने लिहणार "भय्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा", छान वेलबुट्टीची नक्षी पण काढणार. मला स्वर्ग दोन बोटे उरलेला. "माय मरो मावशी उरो" म्हणतात, ताईसाठी अशी म्हण तयार नसली झालेली तरी "ताई" आणी "आई" या शब्दातच फारसा फरक नाहीच, यातच सगळे आले. तीची माया मायेसारखीच, तिला उपमाच नाही.

एव्हाना संध्याकाळ झालेली काका, मावश्या, चुलत-मामे-मावस भावंड यायली सुरुवात झालेली, त्यांच्याबरोबर घरात रंगेबिरंगी चमकीच्या कागदात गुंडाळली पुडकी पण शिरलेली. माझा आनंद आणी उत्साह शिगेला पोचलेला. मीही ठेवणीतला ड्रेस घालुन छान तयार झालेलो. शेवटचा हात ताई फिरवणारच्,थोडा तेलाचा हात डोक्यावर फिरतो, ती चापुनचोपुन माझा भांग पाडते, मी नको नको म्हणुन झटापट करत असतांनाही ती हलकासा पावडरचा पफ फिरवतेच. मी तयार. आता गल्लीतली तसेच शाळेतलीही काही मित्रमंडळीह आलेली. वाढदिवसाचा स्टँडर्ड टाईम "७ वाजता" जवळ आलेला, मी केक कापण्यासाठी उतावीळ. बाबा काका लोकांचे नावडते काम फुगे फुगवणे संपत आलेले, ताई दादातली घराची सजावट रंगेबिरंगी पट्ट्या वैगेरे पुर्ण झालेली. बच्चेकंपनीचा फुल्ल धिंगाणा चालु असतो, क्वचित एखाद्या दोघांची जुंपलेली पण असते. आता केक कापण्याचा प्रोग्राम सुरु व्हायला हवा याचा अंदाज आता मोठ्यांना पण येतो.

घरात मध्यभागी एक टेबल ठेवले जाते, त्यावर एक टेबलक्लॉथ, त्यावर छान सजवलेला केक मध्यभागी ठेवला जातो. मेणबत्ती मध्यभागी लावली जाते, "फुंकायची नाही हं" वर असेही सांगितले जाते. हॅपी बड्डे टु यु च्या मराठी गजरात केक कापला जातो, मलाही भरवला जातो. ताई लगोलग केकचे तुकडे करायला घेते. आता एकेकजण येउन "हॅपी बड्डे" म्हणुन काही ना काही गिफ्ट देउन जात असतो. लगेच उघडुन पहाणे काही शक्य नाही हे माहित असते. एक लहानगा जवळचा मित्र, राजु शेख, हातात जमा केलेली चिल्लर ठेवतो, आठवतेय तशी आजवर मिळालेली आयुष्यातली सर्वोत्तम गिफ्ट असावी ती.

बच्चेकंपनी आणी मोठेलोक पण चिवडा-लाडू-केक खाउन, फुगे घेउन घरी जातात. आता घरात सगळे जवळचे नातेवाईक. ताई दादा आणि मी आलेल्या गिफ्ट उघडुन पहाण्यात मग्न. नुसता आनंद. रात्रीची जेवणं गच्चीवर करायची ठरतात. गच्चीवर लाईट लावला जातो, ताई गच्ची झाडुन काढते, पाणी शिंपडते. गच्चीवर जेवणं पार पडतात.

एव्हाना मी झोपायळलेला असतो. काकवा-मावश्यांन्या त्यांच्या आपापल्या घरी जायचे असते, भावंड पण झोपायला आलेली असतात. देवघरासमोर रांगोळी काढुन पाट ठेवला जातो, डोक्यावर टोपी ठेवुन सगळ्याजणी मला औक्षण करतात. उदंड आयुष्याची शाश्वती तिथेच झालेली असती.

आठवणींच्या या रमलखुणा मला आजही मोहवतात, आजचाही आनंद उद्या मोहावेल, आठवणींच्या रुपाने तो शाश्वत राहील.

धन्यवाद !

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

काहीबाही..

प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ?
तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. अनेक न सुटणार्‍या प्रश्नांवरचा उहापोह, खरेदीची प्लॅनिंग, आईबापांबरोबरची व्युहरचना आणी भारंभार स्वप्नांच्या ओझ्याखाली दबलेला दिवस कातरवेळेबरोबर दिनवाणा होत जातो. दुचाकीही जराशी संथ आणी मिठीही तशीच .. सैलसर. तिला शेवटी उतरायचे असतेच, दिशा-रस्ता आणी सोबत ठरवुन थोडेच होते. रस्ता वळतो दिशा बदलते आणि सोबत संपते. शाश्वत आणि चिरंतन एकटेपणाला कवेत घेउन खुराड्यात शिरायचे.

----------------------------------------------------------------------------------------

सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?

----------------------------------------------------------------------------------------

उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?

----------------------------------------------------------------------------------------

तिच्या डोळ्यातली स्वप्नं, तिचा आनंद आणि तिच्या बेमालुम झाकलेल्या जखमा.
वेड्या कविता, रेहमानची गाणी आणि निलाजरे घड्याळ.
भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल.
वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत.

----------------------------------------------------------------------------------------