शुक्रवार, १९ मार्च, २०१०

काहीबाही..

प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ?
तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. अनेक न सुटणार्‍या प्रश्नांवरचा उहापोह, खरेदीची प्लॅनिंग, आईबापांबरोबरची व्युहरचना आणी भारंभार स्वप्नांच्या ओझ्याखाली दबलेला दिवस कातरवेळेबरोबर दिनवाणा होत जातो. दुचाकीही जराशी संथ आणी मिठीही तशीच .. सैलसर. तिला शेवटी उतरायचे असतेच, दिशा-रस्ता आणी सोबत ठरवुन थोडेच होते. रस्ता वळतो दिशा बदलते आणि सोबत संपते. शाश्वत आणि चिरंतन एकटेपणाला कवेत घेउन खुराड्यात शिरायचे.

----------------------------------------------------------------------------------------

सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?

----------------------------------------------------------------------------------------

उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?

----------------------------------------------------------------------------------------

तिच्या डोळ्यातली स्वप्नं, तिचा आनंद आणि तिच्या बेमालुम झाकलेल्या जखमा.
वेड्या कविता, रेहमानची गाणी आणि निलाजरे घड्याळ.
भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल.
वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत.

----------------------------------------------------------------------------------------

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

चिपाड

साडेबारा पाउण झाला असावा. रखरखीत उन्हात एखादे दुसरे तुरळक वाहन फुफाट्यातुन जातांना धुळीचे लोट उडवत होते. त्या आडबाजुच्या गावातल्या यष्टी ष्टांड्याजवळ असलेली ही रसवंती. रसापेक्षा पेक्षा पाणी पिणारीच लोक जास्त. चरकाला बांधलेल्या घुंगरांचा एकसारख्या खुळ्ळ-खुळ्ळ .. खुळ्ळ-खुळ्ळ आवाजात रघ्या तात्पुरत्या टाकलेल्या मंडपाच्या खांबाला टेकुन पुरता भान हरवुन उभा होता. त्याची नजर चरकाच्या चाकांवर स्थिर होती. त्याला वाटले आपल्या सारख्या माणसाचे आयुष्य पण त्या उसाचा कांडासारखेच सारखेच असावे, रसरशीत तारुण्य कामाच्या बोज्यात पिळुन निघावे अन मग उतरत्या वयानुसार उरलेसुरेली चिपाडं पण एकानंतर एक परत परत सारखी सारखी चरकातुन पिळुन काढली जावीत. कोरडी ठाक झाल्यावर चरकाच्या अगदी मागच्या बाजुला ठेवलेल्या पोत्यात अश्याच अनेक चोथा झालेल्या चिपाडांबरोबर नंतर बेमालुम मिसळुन जाणारी.

नारायणगाव पुणे यस्टी भस्सकन ष्ट्यांडात घुसली आणी थांबली तशी लोकं एकच घाई करुन उतरली ..
त्याला आठवले .. हो तीच ती ... किती बदलली होती. कुठे ढगळ ढगळ पंजाबी ड्रेस मधल, पाठीवरची बॅग समोर धरुन चालणारी, चापुन चोपुन बसवलेल्या लांब केसांची ती .. अन कुठे आताची. पाठीच्या खालचा बराचसा गुबगुबीत भाग दाखणारी ती जिन्स, बारबालेला शोभावा असा चमचमीत पट्टा .. अन तो टिशर्ट पाहुन तर रघ्याच ओशाळला .. थरथरत्या हाताने त्याने रसवंतीचा खटका ओढला. त्याच्या कानात घुमणारी खळ्ळ-खळ्ळ-खळ्ळ थांबली. त्याने मागे वळुन पाहिले, तिच्या कंबरेच्या पट्ट्याच्या आरश्यावरुन उन चमकले .. लख्ख्कन त्याच्या डोळ्यात. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. डोळे गच्च मिटुन त्याने चाचपडतच खिशात हात घातला. बंडलातुन एक बिडी काढुन तिचा चपटा भाग जिभेवर ठेवला आणी तित जराशे दात रुतवुन त्याने काडी ओढली. दोन झुरके घेउन त्याने परत मागे वळुन पाहिले. ती बहुदा रिक्षेची वाट पहात असावी.

मागच्या खिशात पाकिट काढायला हात घातला तो कंगवा खिशातल्या छिद्रात अडकलेला. त्याने कचकच्चुन शिवी घातली अन पाकिट जवळपास ओढुनच काढले. मागच्या वर्षीच्या क्यालेंडरखाली बोटे सारुन त्याने घडी घातलेला कागद काढला. एकवार चापपला. त्यावर ते लिहले त्याकाळी उडवलेली चमकी आता राहिली नव्हती, घड्या दबुन तो फाटायला आला होता. वर्षानुवर्षे दाबलेली इच्छा अचानक उफाळुन आली. त्याला छातीत हलकीशी थरथर जाणवली, डोळ्याखाली जडपणा जाणवला. ते पत्र द्यावे म्हणुन तो पुढे झाला तो तीच वळुन पट्ट्कन म्हणाली .. "जरा एक रस देरे .. बिनाबर्फाचा."

तिच्या आवाजातला परकेपणा त्याच्या मनात विंचवाच्या नांगीसारखा रुतला. तसेच मागे फिरुन त्याने दोन उसाची कांडकी काड्ड्कन घुडघ्यावर मोडली अन खटका ओढुन चरकात ती सारली तेच त्याची बोटे एका हिसड्याने चरकात पिळली गेली. टपाटपा रक्ताच्या धारेने रसाचे भांडे भरायला लागले होते. रघ्या ग्लानीत जातांना त्याला डॉळ्यासमोर नविन चकचकीत कागद दिसत होता, चमकी दिसत होती आणी ती दिसत होती .. ढगळ पंजाबी ड्रेसमधे, बॅग छातीशी घेउन चालणारी. तो आपल्याकडे पहातोय हे समजुन लाजणारी ..

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१०

आजोबा आज्जी .. मावश्या तीन !!

हरवलेलं सुख शोधता शोधता मी एकदा अवचित एका जुन्या लाकडी दारावर येउन थांबलो. त्या दाराची भिंत स्वच्छ चुन्याने रंगवलेली होती, दाराच्या उजवीकडे डावीकडे गेरुच्या रंगाने भालदार चोपदार काढलेले होते, दारावर एक छोटासा कोनाडा होता, आणी त्यात एक सुंदर, टप्पोर्‍या डोळ्यांची बाल गणेशाची मुर्ती होती. आजोबा पहाटे पहाटे देवपुजा झाली की या गणपती पुढेही जास्वंदाचे फुल ठेवत. दाराकडे चेहरा केला तर उजव्या बाजुला एक दगडी सोपा बांधलेला होता. दारामधे आणी सोप्यामधे एक खिडकी होती, सोप्यावरुन त्या खिडकीत सहज चढता येई. खिडकीत चढुन गणपतीसमोर ठेवलेला प्रसाद उचलतांना कित्येक वेळा घसरुन पडायचो मी. अन मग रडायला लागलो की मावश्या बदाफळ म्हणुन चिडवायच्या. त्या गणेशाच्याही वर सुंदर वेलबुट्टीने मढवलेले गेरुनेच लिहलेले नाव होते 'परिमल'.

घर जुने होते, मातीचे होते. आत शिरले की उबदार वाटायचे. समोरच्या खोलीत माझे आवडते पुस्तकांचे कपाट होते. आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते, त्यांना वाचनाची आवड होती. त्या कपाटातच एक जाडजुड लाकडी रुळ होता, त्याला मात्र मी जाम घाबरत असे. मला त्यांनी कधी तो दाखवला नव्हता पण मावश्या त्याला ज्या पद्धतीने घाबरत ते पाहुन मी पण त्याला घाबरत असे. सकाळी देवपुजा झाली की आजोबा मला पाढे लिहायला बसवत, "सुट्ट्यात कसले हो पाढे ? " असे म्हटले की कधी कधी आज्जीच्या अपरोक्ष मला हळुच सुटही देत.

त्या माझ्या आजोळच्या घराच्या मागे अंगण होते. तिथे मी त्या वयात पाहिलेला सगळ्यात मोठा हौद होता. तो हौद धुवायचाही कधे मधे कार्यक्रम असे. हौदाच्या खालचे आउटलेट मोकळे करुन आजोबा सगळे पाणी सोडुन देत, मोठ्ठी धार सुटे. मला त्या वेगवान धारेशी खेळायला मौज वाटे. हौद अर्धा अधिक मोकळा झाला की आजोबा मला त्यात सोडत. त्या क्षणाची वाट मी त्या काळी अगदी प्राण कंठाशी आणुन करे. त्या पाण्यात खेळुन झाले की मग मात्र मला काम करायचे असे, आजोबा पुन्हा उरलेले पाणी सोडुन देत आणी मग मी सगळा हौद साफ करायचा असे. हौदाच्या तळाशी मउ मउ स्वच्छ वाळु सापडे. ती सगळी वाळु मी जमा करुन आज्जीकडे देत असे, घुडघा शेकायला आज्जी ती वाळु वापरे.

त्या मागच्या अंगणात हौदासमोर वेगवेगळी झाडे लावलेली होती, त्यांच्याबुंध्यापाशी नीटस आळी केलेली असत. त्या आळ्यातल्या मातीशी खेळणे, तिथे हरबरा, तीळ वैगेरे पेरणे हा माझ्या अत्यंत आवडता उद्योग होता. मी त्या आळ्यांना माझी शेती म्हणत असे. मी सकाळी उठल्या उठल्या आधी माझी शेती बघायला जाई. एकेदिवशी खरेच अगदी इवलुस्से पाते उगवुन आले होते, मला तर आभाळच ठेंगणे राहिले होते. आजोबांना माझ्या घरी पाठवुन आईला बोलावुन आणले होते. दिवसभर त्या पात्याशेजारी बसुन राहिलो होतो. त्याचा कोवळा पोपटी रंग नंतर मी कितीतरी चित्रात वापरायचो असे आई सांगते (मला काही तशी एक्झ्याक्ट शेट कालवता यायची नाही, मग आईच तसा रंग बनवुन द्यायची). दुपारभर माझे असेच काहीतरी त्या झाडांजवळ उद्योग चालायचे. मग नंतर मी ४ वाजायची वाट पहात राही. कारण ४ वाजेपर्यंत माझ्या तीनही मावश्या घरी आलेल्या असत. मग काय लाडोबाची मजा असायची. खुप हट्ट केला तर दुधाएवजी कधीतरी चहाही चाखायला मिळे (गंधाच्या वाटीत). क्रिमचे बिस्किट म्हणजे पर्वणी.

अंगणाच्या शेवटी छतावर जायला जिना होता, त्याच्या पायर्‍या उंच उंच असल्याने मला चढता येत नसत. मग मी, आजोबा आज्जी आणी मावश्या तीन वर छतावर जात असु. वर गेल्या गेल्या मी आज्जीच्या कडेवरुन सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असे. कारण बाजुचे मोठ्ठे लिंबाचे झाड आणी त्याच्या फांद्या अगदी माझ्या उंचीला आलेल्या दिसत. गच्चीवर लिंबाचा पाला पाचोळा असे, त्यावरुन धावतांना वाळलेली पाने पायानी चुरतांना मोठी मौज येई. माझी मजा संपते न संपते तोच मावशी खराटा घेउन गच्ची झाडायला लागे. एक मावशी बादलीभर पाणी आणुन हलकासा सडा शिंपडे, दुसरी मावशी चटई अंथरे. चुरमुर्‍यांना तिखट मीठ तेल लावुन आणलेले असे. गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत होई. मीही खेळुन खेळुन थकायला येई. आम्ही सगळे खाली घरात यायचो. सातच्या मराठी बातम्या लागायच्या.

जेवणात माझी आवडती शेवयांची खीर असे. मी झोपायला आलो की आज्जी मला अंगाई गाउन झोपवी, काही ओळी मला अजुन ऐकु येतात,

खबडक खबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजोबाआजी मावशा दोन (तीन)

गुरुवार, ३० एप्रिल, २००९

अंधार चांदण्यांचा

उत्तररात्रीनंतर किंवा पहाटेच्या आधी पोर्णिमेचा सुरेख गोलाकार चंद्र पश्चिम क्षितिजावर त्याचे अस्तित्व टिकवायला झगडत असावा.
आकाशाच्या छातीवर चित्रविचित्र आकार गोंदणारे गुढ तारकासमुह फिकट पडुन लुप्त होण्याची भिती बाळगुन असावेत, वाराही साफ पडलेला असावा. दिवसाला दिवस जोडणारा दुवा मी असाच उघड्या कोरड्या डोळ्यांनी संपवत आणलेला असावा. अन आता ते चंद्राचे पश्चिम क्षितिजावर बुडणे असह्य होत जावे...

उघड्या डोळ्यांनी सुरु व्हावा एक स्वप्नमयी भास .. कुठल्याश्या गर्द झाडीत बुडालेल्या दोन डोंगरांच्या दरीत असलेली नदी आणी तिच्या किनार्‍यावर कोरलेली लेणी. किनार्‍यावरच एका विविक्षित ठिकाणी जणु एखादी शापित अप्सराच दगडाची झाली असावी की काय इतपत सुंदर वाटणारी मुर्ती असावी. मी भारावल्यासारखा तिच्याकडे ओढला जावा, अधिरतेने तिला चुंबावा, अन फत्थरात यावी जान, मला जाणवेल न जाणवेल इतकी जाणिव होताच ती धुर बनुन वायुंडलात लुप्त व्हावी.

मी तिथेच तिला शोधत रहावा, तिथल्या निर्जिव खडकात धडका देत. भळाभळा रक्ताच्या धारा लागाव्यात, सगळीकडे होउन जावे लालच लाल .. भडक्क. धुवांधार पावसांच्या धारांनी ती दरी भरावी काठोकाठ अन लालेलाल. त्या लाल स्वप्नातुन जाग यावी कोरडी डोळ्यांनी. पुन्हा तोच बुडणारा चंद्र असावा डोळ्यासमोर अन फिकट चांदणे आकाशात पसरलेले..

चराचराला गिळुन टाकणारी खिन्नता जणु सगळ्या आसमंताला व्यापुन असावी. आपण वेड्यासारखी त्या तेजोनिधीची वाट पहावी. फिकट चांदण्यांना विझवुन बुडत्या चंद्राला बुडवुन लख्ख आसमंत प्रकाशमान होण्याची.
क्षणांना युगांची उपमा थिटी पडावी !
अस्वस्थ पणे निराशा घेरुन यावी अन सगळ्याच रात्रींना संपवणारा सुर्य नसतो असे काहीसे पटायला लागावे.

मज हे कसे उमगले
ते दु:स्वप्न नव्हते
मज चांदणे सुखाचे
केव्हा समीप नव्हते

मम भास होत राही
पुन्हा पुन्हा प्रभेचा
मम झुठ स्वप्न दावी
अंधार चांदण्यांचा

वेड्या पिश्या मनाला
आशा तशीच वेडी
उमजेल काय त्याला
हि काळरात्र आहे

गुरुवार, २६ मार्च, २००९

हरवलेलं सुख

माझं गाव तसं शांत आहे. म्हणजे वर्दळीच्या वेळेतही बर्‍यापैकी मोकळे रस्ते असतात. आमच्या भागात तसा उन्हाळा जरा कडकच. मग दुपारच्या वेळेस उन्हाळ्यात रस्ते, गल्ल्या अगदी मोकळ्या मोकळ्या असतात. तुरळक चुकार एखादी रिक्षा धावते, किंवा कुल्फीवाला/बर्फ का गोलेवाला पुकारा करत जातांना दिसतो. दुपारी मात्रं उन चांगलेच तापलेले असते. शिशिरातली पानगळ धुळीच्या भोवर्‍यांवर स्वार होउन गल्लोगल्ली, छोट्या मोठ्या मैदानांवर नाचत असते. आईची नजर चुकुवुन बाहेर खेळणारे एखादे चिमुरडे त्या वावटळींमधे कागदाचे तुकडे टाकण्यात मग्न असते. एखादी टिक्कल (कागदाचा गोल तुकडा) वावटळीत अडकुन गोल गोल फिरुन भुर्रकन वर उडाली की त्याच्या आनंदाला पारावार रहात नाही.

गरम हवा (झळाया) सुटलेल्या असतात, झाडांची सळसळ अन तुरळक कुठुनतरी लांबुन येणार्‍या टीव्हीच्या हलक्याश्या आवाजात शांतता भरुन राहिलेली असते. अश्यावेळेस घराच्या दारांवर, खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावले जातात, त्यावर पाणी शिंपडुन त्यांच्या ओलेपणाची दुपारपुरती बेगमी केली जाते. घर सुरेख शीतल गार पडते, उन्हाच्या काहिलीने वैतागलेला जीव सुखावतो, सकाळची कामे करुन थकलेल्या आया-मावश्या जरा विसावतात. हलक्या आवाजात विविधभारती लावले जाते, हातातला पेपर अधुन मधुन वारा घेण्यासाठीही हलवला जातो. दुपारच्या जेवणात ताटात कुरडया पापड्या येतात तेव्हाच मनाला त्याची चाहुल लागलेली असते. राजासारखा तो मागावुनच येतो. केशरी पिवळसर घट्ट आमरसाने भरलेली वाटी. अगदी तुडुंब असे जेवण होते. नावापुरती शतपावली केली जाते अन वडिलधार्‍यांचे थोडे दुर्लक्ष झाले की सरळ गारेग्गार्र फरशीवर ताणुन दिली जाते. गाढ झोप लागते.

कपबश्यांच्या किणकिणाटाने झोप चाळवते. एव्हाना उन्हं उतरायला लागलेली असतात गल्लीतल्या पोरासोरांचा किलबिलाट सुरु झालेला असतो. चहाचा सुगंध घरात दरवळतो. गाढ झोपेने अंग अगदी जडावलेले असते, हलावे वाटत नाही. हौदातल्या थंड पाण्याने खसखसुन हात पाय तोंड धुतले जाते, अगदीच उकाडा असेल आणी वडिलधारे बाजुला कोणी नसेल तर पट्टकन बादलीभर पाणी डोक्यावर उपडे पण केले जाते. गात्रंन गात्र सुखावते. जडपणा कुठेल्या कुठे वाहुन जातो. "चल येउन बस इकडे, मी पुसते डोके तुझे !!" असे म्हणताच आज्जीच्या पायाशी बसले जाते. ती खसखसुन डोके पुसतांना वाफाळलेला चहा एकेक घोट करुन अंगात चैतन्य वहावत असतो.

उन्हं पुरती कलल्यावर झाडांना पाणी घालण्याचा कार्यक्रम ठरलेला. आधी मोठी झाडं, मग गच्चीवरच्या कुंड्या. दुपारच्या कडक उन्हात तापलेली माती पाणी पडताच मायेने ओथंबते, हलकासा मृदगंधही जाणवतो. छातीभरभरुन वास घेण्याचा प्रयत्न केला तरी मन भरत नाही. पाउसही लवकरच येणार आहे असे मनाला समजवले जाते, ते तात्पुरते. सगळी झाडं संपल्यावर गच्चीवर आणी अंगणात सडा टाकला जातो. भराभर पाणी सुकुन जाते. त्यांच संध्याकाळचं दुध पिउन झालं की उन्हं उतरल्यामुळे मुलांना बाहेर खेळायची परवानगी मिळते. रांगोळी शिकणार्‍या चिल्ल्यापिल्ल्या सडा टाकलेल्या स्वच्छ अंगणात हात आजमाउन घेतात अन मुले काहीबाही खेळ खेळतात. अगदी किलबिलाट चालु असतो !! टीण्ण टीण्ण अशी घंटी वाजवत एखादा मटका कुल्फी वाला आलेला असतो, परवाच तर खाल्ली होतेस ना अशी सबब मिळुन कुल्फीला नाही म्हणायचा मोठ्याकडुन प्रयत्न होतो पण बच्चे कंपनी ऐकत नाही, दोन वाली किंवा तीन वाली अशी करुन सगळ्यांसाठी एकेक कुल्फी घेतली जाते. कुल्फीवाला माठात हात घालुन अ‍ॅल्युमिनिअमच्या कुल्फी कॅन काढतो. वरचे रबरी बुच काढुन तित काडी खोचुन दोन्ही पंजांच्या मधे सरासर फिरवतो अन झटकन काढुन समोरच्या मुलाच्या हातात देतो, मुल चराचराला विसरलेले असते !!

सुर्य कलतो, तिन्हीसांजा होतात. कातरवेळेचं भान राहु नये म्हणुन देवापुढे दिवा लावला जातो, खेळणारी लहानगी शहाणी बनुन पर्वचा म्हणतात. सातच्या बातम्या सगळ्यांनी मिळुन पाहिल्या जातात. रात्रीची जेवणं झाली की गच्चीवर अंथरुणं टाकली जातात. चंद्रप्रकाशात मोठ्यांच्या गप्पांना अन मुलांच्या दंग्याला उत येतो. शेवटी त्यांना शांत बसवायला हवे म्हणुन आजोबा एखादी छानशी शिवरायांची गोष्ट सांगायला घेतात, चांदण्या बघत - कुतुहलाने गोष्ट ऐकत एकेक पोर शांत झोपी जाते. हळुहळु मोठी माणसं पण पाठ टेकवतात.

चंद्रप्रकाशात न्हायलेलं माझं गावही एव्हाना शांत झालेलं असतं, घर अन घर सुखाने निर्धास्त झोपी जाते.



या लेखाला मिसळपाव डॉट कॉम वर मिळालेले प्रतिसाद पहा.

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

दुवा

आज अखेर तुझ्या न माझ्यातला अखेरचा दुवा पण निखळला. ते तोंडपाठ असलेले दहा आकडे. गायत्री मंत्रापेक्षा जास्त वेळा म्हटलेले. सकाळी एकमेकांना कॉल करुन उठवण्यापासुन ते गुड नाईटच्या एसेमेस पर्यंतचे तसेच रोजच्या सप्तरंगी प्रवासाचे सोबती ते दहा आकडे .. आज निखळले. एकतर्फी संपर्काचा शेवटचा पुल पण ढासळला. हे तुला पुन्हा गमावण्याइतकेच त्रासदायक, उखडुन टाकणारे.

नवा नंबर तुला कळवावा की नाही या विचारातच मला डोळा लागावा अन मी येउन पोहचावा स्वप्नांच्या धुसर निळसर आभासी जगात ! आता एरवी मला अप्राप्य अशी तु अगदी हाताच्या अंतरावर येउन पोहचावी. तुझ्या हातात असावी एक सुरेख शुभ्र हस्तिदंती लहानशी पेटी. तु त्या पेटीला माझ्याकडे पाहुन मला लक्षात येईल असे हृदयाशी कुरवाळावे अन कुतुहलाने मी दंग होत जावा. स्मृती जागी व्हावी अन आठवावा कुठल्यातरी दुकानात त्या पेटीसाठी तु केलेला हट्ट .. हो तीच ती ! माझ्या चेहर्‍यावर ओळखीचे स्मित उमटावे, तुलाही त्याच आठवणीची मला लागलेली ओळख पटुन तुही हर्षभरीत व्हावीस.

त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे. आपल्यासाठीचा हळुवार, खोडकर तरी कधी टोचणार्‍या आठवणींचा खजिना ! त्या पेटीतला तो एवज पाहुन माझे मन आनंदाने उचंबळुन यावे.

आता हाच आपला संपर्क असे जणु तुला सुचवायचे असावे. तु अबोलच रहावीस अन अबोलच गुप्त व्हावीस त्या आठवणींचा खजिन्यासकट.

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !

शनिवार, २० डिसेंबर, २००८

सुन्न करणारं "कोल्ह्याट्याचं पोर"

आई तेच ते गाणे म्हणुन थकली होती. मग कसतरी म्हणु लागली. तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला,
"तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली
आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?"
आई खुप चिडली होती.


अगदी लहान असतांना अजाणत्या वयात अश्या अनेक घटना पहाणारं कोल्ह्याट्याचं पोर त्याचं आख्खं बालपण आईला तिच्या मायेला पारखं होतं. ज्यानं बाप हे नातं कधी पाहिलच नाही आणी ज्या घर नावाच्या जागेत तो लहानपणी राहिला तिथे पदोपदी (हो अक्षरशः पदोपदी ) त्याच्या वाटेला उपेक्षाच आली. ६-८ वर्षाच्या वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत, तमाश्यात नाचणार्‍या मावशीबरोबर फडावर राहुन पडेल ते काम करुन कमावलेल्या पैश्यात, पुढच्या वर्षीच्या अभ्यासाला लागणार्‍या पुस्तकांची खरेदी करण्याची स्वप्नं जेव्हा त्याचा सख्खा आजा एका रात्रीच्या दारुसाठी उधळुन लावतो तेव्हा त्या लहानग्या जिवाला त्याच्या वयाला न शोभणारे प्रश्न पडतात, त्याच्याकडे आपली आई आपल्याबरोबर रहात नाही हे एकच उत्तर असते. हे कोल्ह्याट्याचं पोर नंतर पुस्तकात जागोजागी आई भेटावी म्हणुन नवस करत रहातं. त्याचा देव त्याच्या आज्यासारखाच मुर्दाड होता जणु, कधी पावलाच नाही त्याला. त्याचं बालपण सगळं आईची वाट पहाण्यात अन घरातल्या एतखाउ पुरुषांचा मार खाण्यात गेलेलं. घरातली सगळी बायकांनी करण्याची कामं त्याच्या वाट्याला आलेली असायची. अगदी पाहुण्यांना जेवायला वाढण्यापासुन ते त्यांचे उष्टे खरकटे काढण्यापर्यंत.

त्याच्या आजुबाजुला सगळी आपापल्या वासनांना इच्छांना चटावलेली अन त्यांनाच अग्रक्रम देणारी अन आयुष्यात भावभावनांना फारसे स्थान नसणारी, आपल्या गरजा सोप्यात सोप्या मार्गाने पुर्ण करु इच्छिणारी माणसं होती. घरातले सगळे पुरुष म्हणजे लेकिंना अन बहिणींना नाचायला लावणारे, त्यांच्या पैश्यावर मालकी दाखवुन माज करणारे. त्यांना उत्पन्नाचे साधन मानणारे. एखादा माणुस त्यांच्या घरातल्या मुलीशी-बहिणीशी लग्नाला तयार जरी झाला तरी आधी त्याच्याकडनं आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करवुन घेणारे अन मगच पुढे जाउ देणारे दगड. त्यांना कुठेही किशोरच्या मेहनतीचे, अभ्यासातल्या यशाचे कौतुक वाटत नाही, अभिमान वाटत नाही. अन वाटेलही कसा अभिमान ? पैश्याच्या लालचीनं अन आयतं खाण्याच्या सवयीनं त्यांच्या अभिमानाचा जनु खुनच केलेला असतो.

अशा या सगळ्या वातावरणात वाढणारा, आईपासुन दुरावलेला एक उपरा पोर, नशिबाची सगळी दानं उरफाटी पडत असतांना जिद्दीने शिकतो, डॉक्टर होउन त्याच्या आयुष्याची लढाई लढतो अन जिंकतो पण !
गोड गोजिरी, पैश्याच्या राशीत लोळणारी, तुपात भिजवलेली डिझाइनर दु:ख पाहुन डोळे ओले करण्याची सवय लागलेल्या शहरी माणसाला हे कोल्ह्याट्याचं पोराचं अंगावर येणारं, सुन्न करणारं दु:ख सोसवत नाही, पेलवत नाही.
विजिगिषा हा शब्द तोकडा पडावा इतकी ... अक्षरश: इतकी ... चांगले जगण्याची, शिकण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती कोल्ह्याट्याचं पोर दाखवुन जातं!
आयुष्याला लढाईची उपमा द्यायला याहुन योग्य माणुस नसावा कदाचित !

किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!!



पुस्तकाचे नाव : कोल्ह्याट्याचं पोर
लेखक : डॉ. किशोर शांताबाई काळे
प्रकाशन : ग्रंथाली
किंमत : १०० रु.

टिपः डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे २० फेब. २००७ ला अपघाती निधन झाले.