शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे ..

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारे !
आहे घरासचि असें गमतें मनांस
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !

एका आळसावलेल्या दुपारी, भरल्या पोटी डोळा लागल्यावर मी 'घरी' पोचलो. लांबुन जेंव्हा घर दिसले तेव्हा दारातली कण्हेर मला वाकुन पाहत होती आणि पारिजातकही तिच्यामागुन डोकावत होता. जसे घर जवळ आले तशी रांगोळी दिसली आणि दारात पोचताच दिसले आंब्याच्या पानांचे तोरण. आत शिरताच अगदी आतल्या खोलीतले .. बाहेरुनही थेट दिसणारे देवघर, तिथे तेवत असलेली समई आणि पोपटी पार्श्वभुमीवर लाल गेरुने काढलेली वेलबुट्टी.

स्वयंपाकघरातुन बाहेर पडल्यावर येणारा छोटासा चौक, समोरचा गच्चीवर जाणारा जिना आणि जिन्याखालचा हौद. हौदातल्या गारेग्गार पाण्याने तोंड खसखसुन धुतले आणि तसेच हातपायही धुतले की आपण थकलो होतो ही जाणिवही धुवुन जाते. मी ताजातवाना होतो. मोकळे ढाकळे घरातले कपडे घालुन मस्त विसावतो.

आता माझ्या हातात नेसकॉफीचा कप आहे, नुकताच तरुण भारत वाचुन झालाय आणि समोरुन लोकमत आणायला लहान्या भावाला पिटा़ळलेय. गणपतीबाप्पाच्या जोडीने घरात महालक्ष्मी आलीये. ओल्या नारळाच्या करंज्याचा खरपुस गोडसर वास मला मोहावतो, स्वयंपाकघरात कोणी नाही तो क्षण गाठुन एखादी करंजी उडवायचा बेत पक्का होतो. रिकामा कप ठेवायच्या निमित्ताने मी स्वयंपाकघरात शिरतो आणि जरासा घुटमळतो, तोच आज्जी दरडावते "आता मोठा झाला आहेस, उद्याच्या नैवेद्यासाठीचा प्रसाद आहे तो, उद्या मिळेल." मी हळुच तिथुन निसटतो.

आमच्या गौरींचे मुखवटे पितळी आहेत, दोन का असे विचारल्यावर, एक आईची आणि एक आज्जीची असे उत्तर मिळते. रांगोळीच्या पावलांनी लक्ष्मी येते, वाजतगाजत येते, एव्हाना ताम्हण वाजवायचे माझे काम लहान्या भावाकडे गेलेले आहे. देवींची यथासांग प्रतिष्ठापना होते.

उद्या लक्ष्मी घरी जेवणार, पंचामृत, कोशिंबीरी, कितीतरी भाज्या आणि गोडधोडाची रेलचेल उडणार. बरेच पाहुणे दुपारच्या जेवणाला असणार. आज्जी आणि आई रात्री उशिरापर्यंत काम करत राहणार, आणि उद्या पहाटे पहाटे उठणार. एव्हाना बेसनाचे, रव्याचे लाडूही वळुन झालेत ...

-----------------------------------------

कर्णकर्कश्य आवाजाने मी हडबडुन उठतो, दाण्णकण जमिनीवर आदळण्यावर झाल्यासारखी घाणेरडी फीलींग आलीये, आगीचा बंब भेसुर ओरडत जवळच्या हमरस्त्यावरुन चाल्लाय, मी कावराबावरा झालोय.  पॅटिओतुन डोकावतो, बाहेर विजांचा दणदणाट चाल्लाय, सिविअर वेदरचा अलर्ट कर्कश्य करवादतोय.

जाणवते, 'माझे घर' इथुन फार फार लांब आहे, त्या घरात आता आज्जी नाही, कोणीही नाही, ते घरही आता माझे नाही. आणि आज्जी तर आता नाहीच. ती नकोशी जाणिव मला परतवता येत नाही. हंबरडा फोडावासा वाटतो, पण मी तसाच थांबतो, घसा गोठुन दगडाचा होतो. न राहवुन मी शेवटी माझ्या छोट्याश्या देव्हार्‍यासमोर जाउन उभा राहतो, डोळे मिटतो. कोणतेही आर्जव करण्याआधीच दोन चिमुकले हात माझ्या पायांना धरुन उभा राहण्याची धडपड करतांना जाणवतात ...



 

रविवार, २९ जुलै, २०१२

हरवलेलं सुख ..

"रेहने को घर नही .. सोने के बिस्तर नही .. अपना खुदा है रखवाला ssssssssssss" अशी तान घेत मी बंद गेटवर धाडकन सायकल घातली, गेटची दोन्ही दारं मागं आपटुन वेगानं रिबाउन्स झाली, मला ते सवयीचं असल्यानं मी शिताफीने एक दार सायकलच्या पुढच्या चाकावर आणि दुसरे दार हातानी धरले .. सायकल व्हरांड्यात वाकडी पार्क केली, कॅरिअर आणि सीटच्या बेचक्यातले लॉक लाउन चावी काढली आणि घरात शिरलो. आजोबांनी लगेच "बबड्या गेट लाव आधी" म्हणुन उलटा पाठवला.

घरात आले की बुट काढायचे, दप्तर कप्प्यात ठेवायचे, दंड जागच्या जागी कोपर्‍यात उभा करुन ठेवायचा, हात पाय तोंड धुवायचे, घरातले कपडे घालायचे आणि देवासमोर पर्वचेला बसायचे हा रोजचा नियम. सातच्या बातम्या लागाण्याआधी बोर्नव्हिटा पिउन झालेला असायचा. मग आज शाखेत शिक्षकांनी कोणते कोणते खेळ घेतले, त्यात मीच कसा जिंकलो, बंड्या कापसे ला कसे लोळवले वैगेरे वर्णनं आईला तिखटमीठ लाउन सांगायची. कधेमधे छोटं मोठं खरचटायचं मग आई त्यावर हळद लावायची, मी आईला म्हणायचे बँड एड लाव, ती म्हणायची मोठं काही लागलं तर बँड एड लावतात, उगाच नाही. त्या काळात बँड एडच्या पट्ट्या नवीन आलेल्या होत्या, मला बँड एड लाउन वर्गात स्टाईल मारायची फार इच्छा होती.  बातम्या चालु असतांना गृहपाठ चालु झालेला असे. पाठ असल्या तरी आज्जी उगाचच कविता म्हणुन घेई. दादा ताईचा अभ्यास आधीपासुन चालु असे, त्यांच्या नेहमी दोनशे पानी वह्या असत. साडे आठ नउ पर्यंत मुलांची पहिली पंगत बसे. मला गरमा गरम तव्यावरची पोळी आवडे, मी आईला तवा पोळी वाढ असे म्हणे. आईजवळ कितीही तुपसाखरेसाठी हट्ट केला तरी ती देत नसे, चेहरा पडला की आज्जी तिच्या खास अधिकारात तुपसाखर वाढे :)

आजोबांचे जेवण झाल्यावर ते शतपावलीला मला त्यांच्याबरोबर घेउन जात, आमच्या गल्लीत मोठाले हॅलोजनचे पिवळे दिवे तेंव्हा लावलेले होते, दिव्याकडे पाठ करुन चालतांना त्यांच्या उंच धिप्पाड सावली बरोबर माझी बुटुक बैंगण सावली सावली चाले. आम्ही घरी जाउत तोवर निजायची तयारी झालेली असे, मी माझ्या आजोबांजवळ झोपायचा हट्ट करे. त्यांची धुवट सोलापुरी चादर मला फार आवडे. आजोबा मला नेहमी भिंतीच्या बाजुने झोपवीत. आजोबांच्या डोक्यावर आणि छातीवर पांढरे पांढरे केस होते आणि त्यांची त्वचा किंचित सुरकुतलेली होती. त्याकाळच्या माझ्या चेहर्‍याएवढा त्यांचा तळहात होता, तो मउ नव्हता .. पण रखरखीत पण नव्हता, त्यांच्या तळव्याची त्वचा जाड होती. त्यांच्या तळव्याच्या विरुद्ध बाजूच्या हातावर टप्पोर्‍या धमन्या उठुन दिसत, मला त्या ताकतीचे चिन्ह वाटे, मला त्यांच्याशी खेळायला मोठी मौज वाटे. मी त्यांना विचारे "आबू माझ्यात एवढी ताकत कधी येणार हो ?" ते म्हणत "तु सध्या फक्त पाचच सुर्यनमस्कार मारतोस ना .. जेव्हा दिवसाला एक्कावन्न मारायला लागशील तेव्हा होतील." मग ते मला मी तोवर कधीही न पाहिलेल्या पुण्याबद्दल सांगत, व्यायाम करायला ते पळत पर्वतीवर जात, तिथे किती जोर मारत, मग खाली आल्यावर बादशाही बोर्डिंग मध्ये दुध पित वैगेरे गोष्टी आम्हा सगळ्या भावंडांना माहिती झालेल्या असत. मला ते थोपटवुन झोपी घालायचा प्रयत्न करत, पण मी गोष्ट सांगा म्हणुन मागे लागलेला असे. आजवर शिवाजीच्या गोष्टी, रामाच्या अर्जुनाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगुन झालेल्या असत. मी नवी गोष्ट सांगा म्हणुन हट्ट करे. त्यांनी यावेळेस स्वातंत्र्यलढ्यातली एखादी गोष्ट निवडलेली असे, एव्हाना दादा ताई पण अभ्यास संपवुन आमच्या जवळ आलेले असत.

शेजार्‍या पाजार्‍यांचे दिवे बंद व्हायला सुरुवात झालेली असे, आजोबांच्या पलंगावर मी त्यांच्या मांडीवर डोके ठेउन कधीच झोपी गेलेला असे. स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट ताई दादा पुढे पुर्ण एकत असत..

हरवलेलं सुख ..

रविवार, २२ जानेवारी, २०१२

मला आवडलेली कविता - गुरफटलेली आसवे

शनिवारच्या सुट्टीची दुपार नुसती झोपून आंबवलेली असावी, अगदीच अंधारुन आल्यावर .. कातरवेळही गडद झाल्यावर तुम्ही जडावल्या डोळ्यांनी उठावे आणि वाचनात ही कविता यावी .. गुरफटलेली आसवे

यशस्वी ललित लेखनाची टेस्ट काय असावी ? कमी शब्दातली मांडणी ? कमी शब्दातली अर्थवाही मांडणी ? हां अल्पाक्षरत्व ! हीच खरी ललिताची टेस्ट .. वाचकांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फोडणारी .. दिर्घकाळ जिभेवर चव रेंगाळवणारी रचना .. ललित म्हणजे अशी जादू की जी प्रत्येकाच्या मनात, एका युनिक, वेगळ्या कथेचा रंगमहाल उभा करते .. जो ज्याच्या त्याच्या अनुभवांच्या आणी मानसीच्या चित्रकाराच्या ताकतीनुसार कमी अधिक रंगीत, गुढ, भव्य असावा .. असेलही कदाचित. असे ललित, ज्यात एखादे कथाबीज बेमालुम लपवलेले आहे, माझ्या मनात परिकथेतल्या आकाशापर्यंत पोचणार्‍या झाडासारखे सरसर मोठे होते. जादूई रंगमहाल उभा करते. या फक्त चार ओळीच्या कवितेत ही ताकत कशी आली असावी याचे कोरडे विवेचन करण्यापेक्षा माझ्या जादूई रंगमहालातले एक दार इथे किलकिले करतो ..

कवितेच्या पहिल्या वाचनातच कविता किती अर्थवाही आहे याची ताकत यावी. माझे डोळे पुनर्वाचनासाठी पुन्हा पहिल्या ओळीवर स्थिरावले. चित्रदर्शी ... हो निखळ चित्रदर्शी पहिल्या दोन ओळी. या ओळीतच मानसीच्या चित्रकाराला भलामोठ्ठा कॅनव्हास मिळावा आणी त्याचे कुंचले सरसर फिरायला लागावेत.

काळोखात आसवे आपली
दिली-घेतली, गुरफटलेली.


अंधार्‍या शयनगृहात, एकमेकांवर निरातिशय प्रेम करणारे दोन जीव एकमेकांच्या मिठीत गुरफटलेले असावेत. कसल्या अज्ञात कारणाने ते एकमेकांपासुन दूर होणार असावेत आणि त्या जाणिवेने होणारा आर्त अश्रूपात दोघांनाही अनावर असावा. कदाचित अंखंड चुंबनाच्या वर्षावात ... किंवा भिजलेल्या चेहर्‍याच्या जवळीकीने एकमेकांची आसवेही एकमेकात मिसळून जावीत. प्रेमाच्या या अत्युच्च उत्कट अनुभुतीवर स्वार त्या जोडप्याला आपल्या आसवांच्या मिलनाची ओढ जाणवावी, दूर जाणे बिकट होत जावे आणि एकाने जीवाने दुसर्‍याला विचारावे ..

कोणती तुझी? कळलेच नाही.
माझी ओळखलीस का, तूही?


कोणती आसवे तुझी ? मला कळलेच नाही. तुला माझी आसवे ओळखता येतात ? का तुही तिथेच पोचली आहेस जिथे मी आहे ? (मला कळलेय की आता आपण एकमेकांचे इतके झालो आहोत की आपल्या आसवांनाही एकमेकांची ओढ आहे, तेही एकमेकांत इतके बेमालूम मिसळतात की वेगळे करणे अवघड व्हावे. आसवांची ही कथा तर तू आणि मी वेगळे होण्याची काय कथा ..)

------

ब्राव्हो धनंजय .. ब्राव्हो !!

(श्रेयअव्हेरः वर पहिल्या परिच्छेदात नमुद केल्याप्रमाणे कवितेचे श्रेय धनंजय यांचे, मूळ लिखाण मिसळपाव डॉट कॉम वर http://www.misalpav.com/node/20487)

शनिवार, १७ डिसेंबर, २०११

बोलती पुस्तके

संस्कृतीच्या अर्वाचीन खुणांबरोबरच साहित्याच्याही खुणा सापडतात. लिखित स्वरुपात नसेल तेव्हा मौखिक स्वरुपात होते त्याही आधी प्रथा, कथा, दंतकथा, गोष्टी अश्या स्वरुपात असावे. औद्योगिकरणाच्या शतकात उदयास आलेली आणि माणसाचे आयुष्य आमुलाग्र बदलणारी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी. यथावकाश इलेक्ट्रिसिटीवर चालणारी अनेक उपकरणे उदयास आली. ध्वनीमुद्रण म्हणजेच व्हॉईस रेकॉर्डिंग हा सुद्धा यांतला एक महत्वाचा शोध. १९३० पासुन शाळा कॉलेजांत, सार्वजनिक ग्रंथालयात ध्वनीमुद्रित रेकॉर्ड्स उपलब्ध असल्याचे समजते. पहिले बोलते पुस्तक म्हणजे ऑडियो बुक (Audio Book) इसवी सन १९०० मध्ये उपलब्ध असल्याचे समजते. नंतरच्या काळात अंधांसाठी १९३१ मध्ये अमेरिकन काँग्रेसने 'अमेरिकन फाउंडेशन फॉर ब्लाईंड्स' या संस्थेच्या मदतीने ऑडियो बुक्सचा एक मोठा प्रकल्प राबवला. हा प्रकल्प ऑडियो बुक्स्च्या विकासातला मैलाचा दगड असावा. १९८० च्या सुमारास व्यावसायिक स्वरुपात ऑडियो बुक्स बाजारात उपलब्ध आणि प्रसिद्ध होती.

आजच्या इंटरनेटच्या युगात ऑडियो बुक्ससाठी व्यावसायिक स्तरावर अनेक माध्यमं, संस्थळं उपलब्ध आहेत. लिब्रीवॉक्स (LibriVox) हा प्रकल्प विशेष उल्लेखनीय आहे. हा प्रकल्प म्हणजे प्रताधिकार मुक्त ऑडियो बुक्सचे डिजीटल ग्रंथालय आहे. इथे उपल्ब्ध असलेली ऑडियो बुक्स एकण्यासाठी तुम्हाला मुक्तपणे डाउनलोड करुन घेता येतात (mp3). २००५ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प २००७ पासुन सगळ्यात वेगाने वाढणारा प्रकल्प आहे, म्हणुनच लिब्रीवॉक्स हा ऑडियो बुक्सचा अत्यंत नावाजलेला प्रकाशक असावा. आजच्या घडीला इथे सुमारे ३३ भाषांमध्ये ५००० ऑडियो बुक्स उपलब्ध आहेत. यांतली बहुतांश पुस्तकं ही स्वयंसेवी माध्यमातुन ध्वनीमुद्रित केली गेली आहेत. याच पद्धतीने सरासरी दरमहा सुमारे ९० पुस्तके इथल्या खजिन्यात वाढतात.


खरी आनंदाची गोष्ट म्हणजे मराठीतही असा प्रकल्प सुरु आहे. 'बोलती पुस्तकं' हे अत्यंत गोंडस नाव घेउन सुरु झालेला हा प्रकल्प अगदी असाच, म्हणजे लिब्रीवॉक्स सारखाच चालतो. व्यवसायाने संगणक अभियंता असलेल्या श्री. आनंद वर्तकांनी २००९ च्या जानेवारीत हा प्रकल्प सुरु केला. बोलती पुस्तकेंची ओळख त्यांच्या शब्दात,

आजच्या धकाधकीच्या जगात आपल्यासारख्या "खाऊन-पिऊन सुखी" माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे फावला वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांसाठी यातली एक गोष्ट असते पुस्तकवाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार?

पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं"!

इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांच्या बोलत्या आवृत्त्या उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं यांची कथाकथनं वगळता). यासाठीच आम्ही हा बोलत्या पुस्तकांचा खटाटोप आरंभला आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. आणि आमची सर्व बोलती पुस्तकं ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत, अगदी चकट-फू! तुम्ही ती इथे ऐकू शकता किंवा "डाऊनलोड" करून तुमच्या mp3 player वर.

आता तुम्हाला पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वैपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही पुस्तकं ऐकू शकता. (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!)

++अधिक वाचा++

या प्रकल्पाला आपण सगळ्यांनी यथाशक्ती हातभार लावावा असे आवाहन इथे मी करु इच्छितो. ही मदत प्रताधिकार मुक्त पुस्तकांचे ध्वनीमुद्रण किंवा त्यांच्या स्कॅन कॉपीज उपलब्ध करुन देणे या प्रकारात असु शकते. या संदर्भात boltipustake@gmail.com इथे तुम्ही संपर्क साधु शकता. मराठीतली साहित्यसंपदा सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असावी हा अत्यंत स्तुत्य हेतु बाळगुन सुरु झालेला हा कौतुकास्पद प्रकल्प यशस्वी होणार अशी मनोमन आशा मी बाळगुन आहे.

-
आनंदयात्री

(ऑडिओ बुक्सबद्दलचे संदर्भ विकिपिडीआवरुन घेतले आहेत.)

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

रानफुल

रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो
तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा

मंतरलेल्या रानात रानफुल आणी मी
बघत होतो, प्रतिबिंबं, आमच्याच डोळ्यात तरारलेली

"तू आणि मी, आपण दोघं सारखेच !"
उमलतो पण गंधाला पारखे.
रानफुल सुखावलं ..

रानफुल सुखावलं तेव्हा दिसली होती,
माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार.


रानफुलं रानातच उमलतात .. फुलतात ..
असे म्हणत एकेदिवशी, मी परतलो .. जनरितीनुसार.

जातांना फुल म्हणाले होते, सुकले तरी चालेल,
पण ठेवशील ना मला डायरीत ? .. जनरितीनुसार ?

रविवार, २२ मे, २०११

शाप

माझ्याच जवळच्या माणसाने माझ्या मनाच्या हळव्या-दुखर्‍या वर्मावर वार केल्यावर..... यथावकाश मी अंतर्मुख झालो. या सगळ्या वेदनांचे पुढे काय होत असेल ? त्या कुठे जात असतील ?

माझ्या मनाच्या भिंतींवर, जागोजागी लटकणारी चित्रं मला आठवली.. त्यातली कुरुप बीभत्स चित्रं उघडीनागड्या लावसटींसारखी माझ्यावर धावुन येत होती, जणु त्यांचेच अस्तित्व त्या चार भिंतीत राज्य करते असे ठसवायचा प्रयत्न करत होती. वेदनांची अशीच कुरुप चित्रे होत असावीत. त्रस्त भिंतींनी या बटबटीत चित्रांना फिकट करायची विनवणी करत रहावी आणि त्या चित्रांनी भिंतींच्या हतबलतेवर कृरपणे खदाखदा हसावे.

त्या चित्रांवरच्या वेडावाकड्या रेघोट्या दरवेळी वेगवेगळी भाषा बोलतात, नवा अर्थ लावायला भाग पाडतात. त्यांचा उन्मत्त भडकपणा भिंतींना कोळपुन टाकतो, अव्ययाहत कोळपल्याने भिंतीनी तरी बेदरकारीचे पापुद्रे का धरु नयेत ? त्यांचा हिरवा रहाण्याचा अट्टहास दमछाक करवतो, थकवतो आणि कणाकणाने झिजवतो. अपेक्षाभंगाच्या जाणीवा, पराभूत होण्याची भिती यातून नवी चित्रे हळूहळू आकार घेतात. त्यांनाही वाचण्याचा आणि अर्थ लावण्याचा शाप माझ्या भाळी गोंदलेलाच असावा.

-
आनंदयात्री

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

काहीबाही.. (२)

तु गेलीस तसे, रस्त्यावर, ते कागदाचे कपटे माझ्याभोवती फेर धरुन नाचतात, सरळ अंगावर येउन जर्राशी लगट करुन भुर्रकन उडून जातात. जग जणु मुके होते, काळ थांबतो आणि तलम प्रकाशाच्या पडद्यातुन आठवणी झिरपतात.

------------------------------------------------------------------------------------------------------------

अजुन रामप्रहर आहे, पहाटच्या अंधारात जुईची फुले म्हणजे .. जणु रातभर आकाशी विहरुन क्लांत झालेल्या तारका जमीनीवर विश्रांतीला उतरलेल्या असाव्यात. मी एकेकीला कवेत घेण्याचा प्रयत्न करतो तसे त्यांचे अश्रू माझे हात ओले करतात. मी त्यांना पहाटचे दव असावे म्हणुन विसरण्याचा यत्नात भिजुन जातो.

------------------------------------------------------------------------------------------------------------

भुरभुरते केस .. सुरावटींचे अविष्कार आणि गुलजार .

हसुन ती मला म्हणाली .. मी तुला आवडते का रे ? मी म्हणालो .. आवडते ?? तुझा सहवास म्हणजे काव्यानुभुती !!

तिला मी त्या दिवशी म्हटले आठवणी कधी चिरंतन असतात का ग ? मग मी का नेहमी तु समोर असतांना तुझ्या आठवणीत असतो ? शेवटी हा आठवणींचा अतार्किक आलेख गुंडाळुन मी तिला म्हटले,

कसे व्हावे जगणे अवघड
कश्या व्हाव्यात वाटा धुसर
कसा पडावा त्रैलोक्याचा विसर
आणि चालावा फक्त आठवणींचा जागर ..

रविवार, ४ एप्रिल, २०१०

हरवलेले सुख - वाढदिवस

"आई माझा वाढदिवस कधी येणार गं ?"

"अजुन दोन महिने आहेत रे" ते "आता उद्याच आहे ना" असा उत्तराचा प्रवास पुर्ण करत वाढदिवस एकदाचा येतो. अवचित एखाद्या वर्षी शाळेला दांडी मारायची पण मुभा असायची, दांडी मारायची नसेल तर आख्ख्या वर्गभर चॉकलेटे वाटायची गंमत मिळणार असायची. आधीपासुनच बाबांच्या मागे लागायचे "बाबा यावेळेस गोळ्या नाही हं वाटायच्या, आपण चॉकलेट आणुयात ना वाटायला !". गोळ्या म्हणजे साध्या आणी चॉकलेट म्हणजे भारी ही समजुत अगदीच पक्की. वर्गात चॉकलेट वाटुन संपल्यावर लक्षात यायचे की आपल्यासाठी चॉकलेट काही उरलेच नाहीये, रडवेला चेहरा पाहुन बाईंच्या ते लक्षात यायचेच, मग बाईंच्या वाट्याला आलेले चॉकलेट त्या लगोलग देउन टाकायच्या, नमस्कार केल्यावर पाठीवर हात फिरवायच्या. शाळा कधी परकी वाटलीच नाही.

परगावी कॉलेजात शिकणार्‍या ताईला स्वतःच्या हाताने लिहुन पत्र टाकलेले, पत्रोत्तर येणार की ताई येणार याचा विचार डोक्यात चालुच. शाळेतनं मधल्या सुट्टीतच घरी जाण्याची परवानगी मिळाल्याने आनंदाने घरी यायला निघायचे. वाढदिवसाच्या दिवशी अर्ध्या शाळेतनं घरी जायला मिळणे म्हणजे आनंदाची परमावधी. घरी पोचताच गेट धाडकन्न उघडुन घरात शिरतांना ताई घरात असल्याच्या पाउलखुणा जाणवायच्या, त्याचबरोबर यायचा तो घरी बनवलेल्या गोडसर खरपुस केकचा सुगंध. "तु पत्राला उत्तर का नाही पाठवले ?", "तु इतक्या उशिरा का आलीस ?" वैगेरे प्रश्न कुठल्या कुठे गायबलेले, स्वयंपाकघरात शिरल्यावर ताई पट्ट्कन कडेवर उचलुन घेते. मोठ्या तरसाळ्यात आधी तयार करुन ठेवलेले दोन केक ती दाखवते, तिसरा गॅसवर असतोच. "बाप्परे तीन तीन केक !!" म्हणुन माझा चेहरा फुललेला. स्वयंपाकघरात गॅसवर तवा, तव्यावर वाळु अन त्यावर ते अल्युमिनिअमचे केकचे भांडे. ताई इकडे दुधाच्या पिशवीचा कोन करुन त्यात तुपसाखर भरण्यात गर्क. आता ती केकवर त्याने लिहणार "भय्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा", छान वेलबुट्टीची नक्षी पण काढणार. मला स्वर्ग दोन बोटे उरलेला. "माय मरो मावशी उरो" म्हणतात, ताईसाठी अशी म्हण तयार नसली झालेली तरी "ताई" आणी "आई" या शब्दातच फारसा फरक नाहीच, यातच सगळे आले. तीची माया मायेसारखीच, तिला उपमाच नाही.

एव्हाना संध्याकाळ झालेली काका, मावश्या, चुलत-मामे-मावस भावंड यायली सुरुवात झालेली, त्यांच्याबरोबर घरात रंगेबिरंगी चमकीच्या कागदात गुंडाळली पुडकी पण शिरलेली. माझा आनंद आणी उत्साह शिगेला पोचलेला. मीही ठेवणीतला ड्रेस घालुन छान तयार झालेलो. शेवटचा हात ताई फिरवणारच्,थोडा तेलाचा हात डोक्यावर फिरतो, ती चापुनचोपुन माझा भांग पाडते, मी नको नको म्हणुन झटापट करत असतांनाही ती हलकासा पावडरचा पफ फिरवतेच. मी तयार. आता गल्लीतली तसेच शाळेतलीही काही मित्रमंडळीह आलेली. वाढदिवसाचा स्टँडर्ड टाईम "७ वाजता" जवळ आलेला, मी केक कापण्यासाठी उतावीळ. बाबा काका लोकांचे नावडते काम फुगे फुगवणे संपत आलेले, ताई दादातली घराची सजावट रंगेबिरंगी पट्ट्या वैगेरे पुर्ण झालेली. बच्चेकंपनीचा फुल्ल धिंगाणा चालु असतो, क्वचित एखाद्या दोघांची जुंपलेली पण असते. आता केक कापण्याचा प्रोग्राम सुरु व्हायला हवा याचा अंदाज आता मोठ्यांना पण येतो.

घरात मध्यभागी एक टेबल ठेवले जाते, त्यावर एक टेबलक्लॉथ, त्यावर छान सजवलेला केक मध्यभागी ठेवला जातो. मेणबत्ती मध्यभागी लावली जाते, "फुंकायची नाही हं" वर असेही सांगितले जाते. हॅपी बड्डे टु यु च्या मराठी गजरात केक कापला जातो, मलाही भरवला जातो. ताई लगोलग केकचे तुकडे करायला घेते. आता एकेकजण येउन "हॅपी बड्डे" म्हणुन काही ना काही गिफ्ट देउन जात असतो. लगेच उघडुन पहाणे काही शक्य नाही हे माहित असते. एक लहानगा जवळचा मित्र, राजु शेख, हातात जमा केलेली चिल्लर ठेवतो, आठवतेय तशी आजवर मिळालेली आयुष्यातली सर्वोत्तम गिफ्ट असावी ती.

बच्चेकंपनी आणी मोठेलोक पण चिवडा-लाडू-केक खाउन, फुगे घेउन घरी जातात. आता घरात सगळे जवळचे नातेवाईक. ताई दादा आणि मी आलेल्या गिफ्ट उघडुन पहाण्यात मग्न. नुसता आनंद. रात्रीची जेवणं गच्चीवर करायची ठरतात. गच्चीवर लाईट लावला जातो, ताई गच्ची झाडुन काढते, पाणी शिंपडते. गच्चीवर जेवणं पार पडतात.

एव्हाना मी झोपायळलेला असतो. काकवा-मावश्यांन्या त्यांच्या आपापल्या घरी जायचे असते, भावंड पण झोपायला आलेली असतात. देवघरासमोर रांगोळी काढुन पाट ठेवला जातो, डोक्यावर टोपी ठेवुन सगळ्याजणी मला औक्षण करतात. उदंड आयुष्याची शाश्वती तिथेच झालेली असती.

आठवणींच्या या रमलखुणा मला आजही मोहवतात, आजचाही आनंद उद्या मोहावेल, आठवणींच्या रुपाने तो शाश्वत राहील.

धन्यवाद !

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

काहीबाही..

प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ?
तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. अनेक न सुटणार्‍या प्रश्नांवरचा उहापोह, खरेदीची प्लॅनिंग, आईबापांबरोबरची व्युहरचना आणी भारंभार स्वप्नांच्या ओझ्याखाली दबलेला दिवस कातरवेळेबरोबर दिनवाणा होत जातो. दुचाकीही जराशी संथ आणी मिठीही तशीच .. सैलसर. तिला शेवटी उतरायचे असतेच, दिशा-रस्ता आणी सोबत ठरवुन थोडेच होते. रस्ता वळतो दिशा बदलते आणि सोबत संपते. शाश्वत आणि चिरंतन एकटेपणाला कवेत घेउन खुराड्यात शिरायचे.

----------------------------------------------------------------------------------------

सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?

----------------------------------------------------------------------------------------

उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?

----------------------------------------------------------------------------------------

तिच्या डोळ्यातली स्वप्नं, तिचा आनंद आणि तिच्या बेमालुम झाकलेल्या जखमा.
वेड्या कविता, रेहमानची गाणी आणि निलाजरे घड्याळ.
भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल.
वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत.

----------------------------------------------------------------------------------------

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

चिपाड

साडेबारा पाउण झाला असावा. रखरखीत उन्हात एखादे दुसरे तुरळक वाहन फुफाट्यातुन जातांना धुळीचे लोट उडवत होते. त्या आडबाजुच्या गावातल्या यष्टी ष्टांड्याजवळ असलेली ही रसवंती. रसापेक्षा पेक्षा पाणी पिणारीच लोक जास्त. चरकाला बांधलेल्या घुंगरांचा एकसारख्या खुळ्ळ-खुळ्ळ .. खुळ्ळ-खुळ्ळ आवाजात रघ्या तात्पुरत्या टाकलेल्या मंडपाच्या खांबाला टेकुन पुरता भान हरवुन उभा होता. त्याची नजर चरकाच्या चाकांवर स्थिर होती. त्याला वाटले आपल्या सारख्या माणसाचे आयुष्य पण त्या उसाचा कांडासारखेच सारखेच असावे, रसरशीत तारुण्य कामाच्या बोज्यात पिळुन निघावे अन मग उतरत्या वयानुसार उरलेसुरेली चिपाडं पण एकानंतर एक परत परत सारखी सारखी चरकातुन पिळुन काढली जावीत. कोरडी ठाक झाल्यावर चरकाच्या अगदी मागच्या बाजुला ठेवलेल्या पोत्यात अश्याच अनेक चोथा झालेल्या चिपाडांबरोबर नंतर बेमालुम मिसळुन जाणारी.

नारायणगाव पुणे यस्टी भस्सकन ष्ट्यांडात घुसली आणी थांबली तशी लोकं एकच घाई करुन उतरली ..
त्याला आठवले .. हो तीच ती ... किती बदलली होती. कुठे ढगळ ढगळ पंजाबी ड्रेस मधल, पाठीवरची बॅग समोर धरुन चालणारी, चापुन चोपुन बसवलेल्या लांब केसांची ती .. अन कुठे आताची. पाठीच्या खालचा बराचसा गुबगुबीत भाग दाखणारी ती जिन्स, बारबालेला शोभावा असा चमचमीत पट्टा .. अन तो टिशर्ट पाहुन तर रघ्याच ओशाळला .. थरथरत्या हाताने त्याने रसवंतीचा खटका ओढला. त्याच्या कानात घुमणारी खळ्ळ-खळ्ळ-खळ्ळ थांबली. त्याने मागे वळुन पाहिले, तिच्या कंबरेच्या पट्ट्याच्या आरश्यावरुन उन चमकले .. लख्ख्कन त्याच्या डोळ्यात. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. डोळे गच्च मिटुन त्याने चाचपडतच खिशात हात घातला. बंडलातुन एक बिडी काढुन तिचा चपटा भाग जिभेवर ठेवला आणी तित जराशे दात रुतवुन त्याने काडी ओढली. दोन झुरके घेउन त्याने परत मागे वळुन पाहिले. ती बहुदा रिक्षेची वाट पहात असावी.

मागच्या खिशात पाकिट काढायला हात घातला तो कंगवा खिशातल्या छिद्रात अडकलेला. त्याने कचकच्चुन शिवी घातली अन पाकिट जवळपास ओढुनच काढले. मागच्या वर्षीच्या क्यालेंडरखाली बोटे सारुन त्याने घडी घातलेला कागद काढला. एकवार चापपला. त्यावर ते लिहले त्याकाळी उडवलेली चमकी आता राहिली नव्हती, घड्या दबुन तो फाटायला आला होता. वर्षानुवर्षे दाबलेली इच्छा अचानक उफाळुन आली. त्याला छातीत हलकीशी थरथर जाणवली, डोळ्याखाली जडपणा जाणवला. ते पत्र द्यावे म्हणुन तो पुढे झाला तो तीच वळुन पट्ट्कन म्हणाली .. "जरा एक रस देरे .. बिनाबर्फाचा."

तिच्या आवाजातला परकेपणा त्याच्या मनात विंचवाच्या नांगीसारखा रुतला. तसेच मागे फिरुन त्याने दोन उसाची कांडकी काड्ड्कन घुडघ्यावर मोडली अन खटका ओढुन चरकात ती सारली तेच त्याची बोटे एका हिसड्याने चरकात पिळली गेली. टपाटपा रक्ताच्या धारेने रसाचे भांडे भरायला लागले होते. रघ्या ग्लानीत जातांना त्याला डॉळ्यासमोर नविन चकचकीत कागद दिसत होता, चमकी दिसत होती आणी ती दिसत होती .. ढगळ पंजाबी ड्रेसमधे, बॅग छातीशी घेउन चालणारी. तो आपल्याकडे पहातोय हे समजुन लाजणारी ..

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१०

आजोबा आज्जी .. मावश्या तीन !!

हरवलेलं सुख शोधता शोधता मी एकदा अवचित एका जुन्या लाकडी दारावर येउन थांबलो. त्या दाराची भिंत स्वच्छ चुन्याने रंगवलेली होती, दाराच्या उजवीकडे डावीकडे गेरुच्या रंगाने भालदार चोपदार काढलेले होते, दारावर एक छोटासा कोनाडा होता, आणी त्यात एक सुंदर, टप्पोर्‍या डोळ्यांची बाल गणेशाची मुर्ती होती. आजोबा पहाटे पहाटे देवपुजा झाली की या गणपती पुढेही जास्वंदाचे फुल ठेवत. दाराकडे चेहरा केला तर उजव्या बाजुला एक दगडी सोपा बांधलेला होता. दारामधे आणी सोप्यामधे एक खिडकी होती, सोप्यावरुन त्या खिडकीत सहज चढता येई. खिडकीत चढुन गणपतीसमोर ठेवलेला प्रसाद उचलतांना कित्येक वेळा घसरुन पडायचो मी. अन मग रडायला लागलो की मावश्या बदाफळ म्हणुन चिडवायच्या. त्या गणेशाच्याही वर सुंदर वेलबुट्टीने मढवलेले गेरुनेच लिहलेले नाव होते 'परिमल'.

घर जुने होते, मातीचे होते. आत शिरले की उबदार वाटायचे. समोरच्या खोलीत माझे आवडते पुस्तकांचे कपाट होते. आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते, त्यांना वाचनाची आवड होती. त्या कपाटातच एक जाडजुड लाकडी रुळ होता, त्याला मात्र मी जाम घाबरत असे. मला त्यांनी कधी तो दाखवला नव्हता पण मावश्या त्याला ज्या पद्धतीने घाबरत ते पाहुन मी पण त्याला घाबरत असे. सकाळी देवपुजा झाली की आजोबा मला पाढे लिहायला बसवत, "सुट्ट्यात कसले हो पाढे ? " असे म्हटले की कधी कधी आज्जीच्या अपरोक्ष मला हळुच सुटही देत.

त्या माझ्या आजोळच्या घराच्या मागे अंगण होते. तिथे मी त्या वयात पाहिलेला सगळ्यात मोठा हौद होता. तो हौद धुवायचाही कधे मधे कार्यक्रम असे. हौदाच्या खालचे आउटलेट मोकळे करुन आजोबा सगळे पाणी सोडुन देत, मोठ्ठी धार सुटे. मला त्या वेगवान धारेशी खेळायला मौज वाटे. हौद अर्धा अधिक मोकळा झाला की आजोबा मला त्यात सोडत. त्या क्षणाची वाट मी त्या काळी अगदी प्राण कंठाशी आणुन करे. त्या पाण्यात खेळुन झाले की मग मात्र मला काम करायचे असे, आजोबा पुन्हा उरलेले पाणी सोडुन देत आणी मग मी सगळा हौद साफ करायचा असे. हौदाच्या तळाशी मउ मउ स्वच्छ वाळु सापडे. ती सगळी वाळु मी जमा करुन आज्जीकडे देत असे, घुडघा शेकायला आज्जी ती वाळु वापरे.

त्या मागच्या अंगणात हौदासमोर वेगवेगळी झाडे लावलेली होती, त्यांच्याबुंध्यापाशी नीटस आळी केलेली असत. त्या आळ्यातल्या मातीशी खेळणे, तिथे हरबरा, तीळ वैगेरे पेरणे हा माझ्या अत्यंत आवडता उद्योग होता. मी त्या आळ्यांना माझी शेती म्हणत असे. मी सकाळी उठल्या उठल्या आधी माझी शेती बघायला जाई. एकेदिवशी खरेच अगदी इवलुस्से पाते उगवुन आले होते, मला तर आभाळच ठेंगणे राहिले होते. आजोबांना माझ्या घरी पाठवुन आईला बोलावुन आणले होते. दिवसभर त्या पात्याशेजारी बसुन राहिलो होतो. त्याचा कोवळा पोपटी रंग नंतर मी कितीतरी चित्रात वापरायचो असे आई सांगते (मला काही तशी एक्झ्याक्ट शेट कालवता यायची नाही, मग आईच तसा रंग बनवुन द्यायची). दुपारभर माझे असेच काहीतरी त्या झाडांजवळ उद्योग चालायचे. मग नंतर मी ४ वाजायची वाट पहात राही. कारण ४ वाजेपर्यंत माझ्या तीनही मावश्या घरी आलेल्या असत. मग काय लाडोबाची मजा असायची. खुप हट्ट केला तर दुधाएवजी कधीतरी चहाही चाखायला मिळे (गंधाच्या वाटीत). क्रिमचे बिस्किट म्हणजे पर्वणी.

अंगणाच्या शेवटी छतावर जायला जिना होता, त्याच्या पायर्‍या उंच उंच असल्याने मला चढता येत नसत. मग मी, आजोबा आज्जी आणी मावश्या तीन वर छतावर जात असु. वर गेल्या गेल्या मी आज्जीच्या कडेवरुन सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असे. कारण बाजुचे मोठ्ठे लिंबाचे झाड आणी त्याच्या फांद्या अगदी माझ्या उंचीला आलेल्या दिसत. गच्चीवर लिंबाचा पाला पाचोळा असे, त्यावरुन धावतांना वाळलेली पाने पायानी चुरतांना मोठी मौज येई. माझी मजा संपते न संपते तोच मावशी खराटा घेउन गच्ची झाडायला लागे. एक मावशी बादलीभर पाणी आणुन हलकासा सडा शिंपडे, दुसरी मावशी चटई अंथरे. चुरमुर्‍यांना तिखट मीठ तेल लावुन आणलेले असे. गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत होई. मीही खेळुन खेळुन थकायला येई. आम्ही सगळे खाली घरात यायचो. सातच्या मराठी बातम्या लागायच्या.

जेवणात माझी आवडती शेवयांची खीर असे. मी झोपायला आलो की आज्जी मला अंगाई गाउन झोपवी, काही ओळी मला अजुन ऐकु येतात,

खबडक खबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजोबाआजी मावशा दोन (तीन)

गुरुवार, ३० एप्रिल, २००९

अंधार चांदण्यांचा

उत्तररात्रीनंतर किंवा पहाटेच्या आधी पोर्णिमेचा सुरेख गोलाकार चंद्र पश्चिम क्षितिजावर त्याचे अस्तित्व टिकवायला झगडत असावा.
आकाशाच्या छातीवर चित्रविचित्र आकार गोंदणारे गुढ तारकासमुह फिकट पडुन लुप्त होण्याची भिती बाळगुन असावेत, वाराही साफ पडलेला असावा. दिवसाला दिवस जोडणारा दुवा मी असाच उघड्या कोरड्या डोळ्यांनी संपवत आणलेला असावा. अन आता ते चंद्राचे पश्चिम क्षितिजावर बुडणे असह्य होत जावे...

उघड्या डोळ्यांनी सुरु व्हावा एक स्वप्नमयी भास .. कुठल्याश्या गर्द झाडीत बुडालेल्या दोन डोंगरांच्या दरीत असलेली नदी आणी तिच्या किनार्‍यावर कोरलेली लेणी. किनार्‍यावरच एका विविक्षित ठिकाणी जणु एखादी शापित अप्सराच दगडाची झाली असावी की काय इतपत सुंदर वाटणारी मुर्ती असावी. मी भारावल्यासारखा तिच्याकडे ओढला जावा, अधिरतेने तिला चुंबावा, अन फत्थरात यावी जान, मला जाणवेल न जाणवेल इतकी जाणिव होताच ती धुर बनुन वायुंडलात लुप्त व्हावी.

मी तिथेच तिला शोधत रहावा, तिथल्या निर्जिव खडकात धडका देत. भळाभळा रक्ताच्या धारा लागाव्यात, सगळीकडे होउन जावे लालच लाल .. भडक्क. धुवांधार पावसांच्या धारांनी ती दरी भरावी काठोकाठ अन लालेलाल. त्या लाल स्वप्नातुन जाग यावी कोरडी डोळ्यांनी. पुन्हा तोच बुडणारा चंद्र असावा डोळ्यासमोर अन फिकट चांदणे आकाशात पसरलेले..

चराचराला गिळुन टाकणारी खिन्नता जणु सगळ्या आसमंताला व्यापुन असावी. आपण वेड्यासारखी त्या तेजोनिधीची वाट पहावी. फिकट चांदण्यांना विझवुन बुडत्या चंद्राला बुडवुन लख्ख आसमंत प्रकाशमान होण्याची.
क्षणांना युगांची उपमा थिटी पडावी !
अस्वस्थ पणे निराशा घेरुन यावी अन सगळ्याच रात्रींना संपवणारा सुर्य नसतो असे काहीसे पटायला लागावे.

मज हे कसे उमगले
ते दु:स्वप्न नव्हते
मज चांदणे सुखाचे
केव्हा समीप नव्हते

मम भास होत राही
पुन्हा पुन्हा प्रभेचा
मम झुठ स्वप्न दावी
अंधार चांदण्यांचा

वेड्या पिश्या मनाला
आशा तशीच वेडी
उमजेल काय त्याला
हि काळरात्र आहे

गुरुवार, २६ मार्च, २००९

हरवलेलं सुख

माझं गाव तसं शांत आहे. म्हणजे वर्दळीच्या वेळेतही बर्‍यापैकी मोकळे रस्ते असतात. आमच्या भागात तसा उन्हाळा जरा कडकच. मग दुपारच्या वेळेस उन्हाळ्यात रस्ते, गल्ल्या अगदी मोकळ्या मोकळ्या असतात. तुरळक चुकार एखादी रिक्षा धावते, किंवा कुल्फीवाला/बर्फ का गोलेवाला पुकारा करत जातांना दिसतो. दुपारी मात्रं उन चांगलेच तापलेले असते. शिशिरातली पानगळ धुळीच्या भोवर्‍यांवर स्वार होउन गल्लोगल्ली, छोट्या मोठ्या मैदानांवर नाचत असते. आईची नजर चुकुवुन बाहेर खेळणारे एखादे चिमुरडे त्या वावटळींमधे कागदाचे तुकडे टाकण्यात मग्न असते. एखादी टिक्कल (कागदाचा गोल तुकडा) वावटळीत अडकुन गोल गोल फिरुन भुर्रकन वर उडाली की त्याच्या आनंदाला पारावार रहात नाही.

गरम हवा (झळाया) सुटलेल्या असतात, झाडांची सळसळ अन तुरळक कुठुनतरी लांबुन येणार्‍या टीव्हीच्या हलक्याश्या आवाजात शांतता भरुन राहिलेली असते. अश्यावेळेस घराच्या दारांवर, खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावले जातात, त्यावर पाणी शिंपडुन त्यांच्या ओलेपणाची दुपारपुरती बेगमी केली जाते. घर सुरेख शीतल गार पडते, उन्हाच्या काहिलीने वैतागलेला जीव सुखावतो, सकाळची कामे करुन थकलेल्या आया-मावश्या जरा विसावतात. हलक्या आवाजात विविधभारती लावले जाते, हातातला पेपर अधुन मधुन वारा घेण्यासाठीही हलवला जातो. दुपारच्या जेवणात ताटात कुरडया पापड्या येतात तेव्हाच मनाला त्याची चाहुल लागलेली असते. राजासारखा तो मागावुनच येतो. केशरी पिवळसर घट्ट आमरसाने भरलेली वाटी. अगदी तुडुंब असे जेवण होते. नावापुरती शतपावली केली जाते अन वडिलधार्‍यांचे थोडे दुर्लक्ष झाले की सरळ गारेग्गार्र फरशीवर ताणुन दिली जाते. गाढ झोप लागते.

कपबश्यांच्या किणकिणाटाने झोप चाळवते. एव्हाना उन्हं उतरायला लागलेली असतात गल्लीतल्या पोरासोरांचा किलबिलाट सुरु झालेला असतो. चहाचा सुगंध घरात दरवळतो. गाढ झोपेने अंग अगदी जडावलेले असते, हलावे वाटत नाही. हौदातल्या थंड पाण्याने खसखसुन हात पाय तोंड धुतले जाते, अगदीच उकाडा असेल आणी वडिलधारे बाजुला कोणी नसेल तर पट्टकन बादलीभर पाणी डोक्यावर उपडे पण केले जाते. गात्रंन गात्र सुखावते. जडपणा कुठेल्या कुठे वाहुन जातो. "चल येउन बस इकडे, मी पुसते डोके तुझे !!" असे म्हणताच आज्जीच्या पायाशी बसले जाते. ती खसखसुन डोके पुसतांना वाफाळलेला चहा एकेक घोट करुन अंगात चैतन्य वहावत असतो.

उन्हं पुरती कलल्यावर झाडांना पाणी घालण्याचा कार्यक्रम ठरलेला. आधी मोठी झाडं, मग गच्चीवरच्या कुंड्या. दुपारच्या कडक उन्हात तापलेली माती पाणी पडताच मायेने ओथंबते, हलकासा मृदगंधही जाणवतो. छातीभरभरुन वास घेण्याचा प्रयत्न केला तरी मन भरत नाही. पाउसही लवकरच येणार आहे असे मनाला समजवले जाते, ते तात्पुरते. सगळी झाडं संपल्यावर गच्चीवर आणी अंगणात सडा टाकला जातो. भराभर पाणी सुकुन जाते. त्यांच संध्याकाळचं दुध पिउन झालं की उन्हं उतरल्यामुळे मुलांना बाहेर खेळायची परवानगी मिळते. रांगोळी शिकणार्‍या चिल्ल्यापिल्ल्या सडा टाकलेल्या स्वच्छ अंगणात हात आजमाउन घेतात अन मुले काहीबाही खेळ खेळतात. अगदी किलबिलाट चालु असतो !! टीण्ण टीण्ण अशी घंटी वाजवत एखादा मटका कुल्फी वाला आलेला असतो, परवाच तर खाल्ली होतेस ना अशी सबब मिळुन कुल्फीला नाही म्हणायचा मोठ्याकडुन प्रयत्न होतो पण बच्चे कंपनी ऐकत नाही, दोन वाली किंवा तीन वाली अशी करुन सगळ्यांसाठी एकेक कुल्फी घेतली जाते. कुल्फीवाला माठात हात घालुन अ‍ॅल्युमिनिअमच्या कुल्फी कॅन काढतो. वरचे रबरी बुच काढुन तित काडी खोचुन दोन्ही पंजांच्या मधे सरासर फिरवतो अन झटकन काढुन समोरच्या मुलाच्या हातात देतो, मुल चराचराला विसरलेले असते !!

सुर्य कलतो, तिन्हीसांजा होतात. कातरवेळेचं भान राहु नये म्हणुन देवापुढे दिवा लावला जातो, खेळणारी लहानगी शहाणी बनुन पर्वचा म्हणतात. सातच्या बातम्या सगळ्यांनी मिळुन पाहिल्या जातात. रात्रीची जेवणं झाली की गच्चीवर अंथरुणं टाकली जातात. चंद्रप्रकाशात मोठ्यांच्या गप्पांना अन मुलांच्या दंग्याला उत येतो. शेवटी त्यांना शांत बसवायला हवे म्हणुन आजोबा एखादी छानशी शिवरायांची गोष्ट सांगायला घेतात, चांदण्या बघत - कुतुहलाने गोष्ट ऐकत एकेक पोर शांत झोपी जाते. हळुहळु मोठी माणसं पण पाठ टेकवतात.

चंद्रप्रकाशात न्हायलेलं माझं गावही एव्हाना शांत झालेलं असतं, घर अन घर सुखाने निर्धास्त झोपी जाते.



या लेखाला मिसळपाव डॉट कॉम वर मिळालेले प्रतिसाद पहा.

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

दुवा

आज अखेर तुझ्या न माझ्यातला अखेरचा दुवा पण निखळला. ते तोंडपाठ असलेले दहा आकडे. गायत्री मंत्रापेक्षा जास्त वेळा म्हटलेले. सकाळी एकमेकांना कॉल करुन उठवण्यापासुन ते गुड नाईटच्या एसेमेस पर्यंतचे तसेच रोजच्या सप्तरंगी प्रवासाचे सोबती ते दहा आकडे .. आज निखळले. एकतर्फी संपर्काचा शेवटचा पुल पण ढासळला. हे तुला पुन्हा गमावण्याइतकेच त्रासदायक, उखडुन टाकणारे.

नवा नंबर तुला कळवावा की नाही या विचारातच मला डोळा लागावा अन मी येउन पोहचावा स्वप्नांच्या धुसर निळसर आभासी जगात ! आता एरवी मला अप्राप्य अशी तु अगदी हाताच्या अंतरावर येउन पोहचावी. तुझ्या हातात असावी एक सुरेख शुभ्र हस्तिदंती लहानशी पेटी. तु त्या पेटीला माझ्याकडे पाहुन मला लक्षात येईल असे हृदयाशी कुरवाळावे अन कुतुहलाने मी दंग होत जावा. स्मृती जागी व्हावी अन आठवावा कुठल्यातरी दुकानात त्या पेटीसाठी तु केलेला हट्ट .. हो तीच ती ! माझ्या चेहर्‍यावर ओळखीचे स्मित उमटावे, तुलाही त्याच आठवणीची मला लागलेली ओळख पटुन तुही हर्षभरीत व्हावीस.

त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे. आपल्यासाठीचा हळुवार, खोडकर तरी कधी टोचणार्‍या आठवणींचा खजिना ! त्या पेटीतला तो एवज पाहुन माझे मन आनंदाने उचंबळुन यावे.

आता हाच आपला संपर्क असे जणु तुला सुचवायचे असावे. तु अबोलच रहावीस अन अबोलच गुप्त व्हावीस त्या आठवणींचा खजिन्यासकट.

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !

शनिवार, २० डिसेंबर, २००८

सुन्न करणारं "कोल्ह्याट्याचं पोर"

आई तेच ते गाणे म्हणुन थकली होती. मग कसतरी म्हणु लागली. तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला,
"तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली
आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?"
आई खुप चिडली होती.


अगदी लहान असतांना अजाणत्या वयात अश्या अनेक घटना पहाणारं कोल्ह्याट्याचं पोर त्याचं आख्खं बालपण आईला तिच्या मायेला पारखं होतं. ज्यानं बाप हे नातं कधी पाहिलच नाही आणी ज्या घर नावाच्या जागेत तो लहानपणी राहिला तिथे पदोपदी (हो अक्षरशः पदोपदी ) त्याच्या वाटेला उपेक्षाच आली. ६-८ वर्षाच्या वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत, तमाश्यात नाचणार्‍या मावशीबरोबर फडावर राहुन पडेल ते काम करुन कमावलेल्या पैश्यात, पुढच्या वर्षीच्या अभ्यासाला लागणार्‍या पुस्तकांची खरेदी करण्याची स्वप्नं जेव्हा त्याचा सख्खा आजा एका रात्रीच्या दारुसाठी उधळुन लावतो तेव्हा त्या लहानग्या जिवाला त्याच्या वयाला न शोभणारे प्रश्न पडतात, त्याच्याकडे आपली आई आपल्याबरोबर रहात नाही हे एकच उत्तर असते. हे कोल्ह्याट्याचं पोर नंतर पुस्तकात जागोजागी आई भेटावी म्हणुन नवस करत रहातं. त्याचा देव त्याच्या आज्यासारखाच मुर्दाड होता जणु, कधी पावलाच नाही त्याला. त्याचं बालपण सगळं आईची वाट पहाण्यात अन घरातल्या एतखाउ पुरुषांचा मार खाण्यात गेलेलं. घरातली सगळी बायकांनी करण्याची कामं त्याच्या वाट्याला आलेली असायची. अगदी पाहुण्यांना जेवायला वाढण्यापासुन ते त्यांचे उष्टे खरकटे काढण्यापर्यंत.

त्याच्या आजुबाजुला सगळी आपापल्या वासनांना इच्छांना चटावलेली अन त्यांनाच अग्रक्रम देणारी अन आयुष्यात भावभावनांना फारसे स्थान नसणारी, आपल्या गरजा सोप्यात सोप्या मार्गाने पुर्ण करु इच्छिणारी माणसं होती. घरातले सगळे पुरुष म्हणजे लेकिंना अन बहिणींना नाचायला लावणारे, त्यांच्या पैश्यावर मालकी दाखवुन माज करणारे. त्यांना उत्पन्नाचे साधन मानणारे. एखादा माणुस त्यांच्या घरातल्या मुलीशी-बहिणीशी लग्नाला तयार जरी झाला तरी आधी त्याच्याकडनं आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करवुन घेणारे अन मगच पुढे जाउ देणारे दगड. त्यांना कुठेही किशोरच्या मेहनतीचे, अभ्यासातल्या यशाचे कौतुक वाटत नाही, अभिमान वाटत नाही. अन वाटेलही कसा अभिमान ? पैश्याच्या लालचीनं अन आयतं खाण्याच्या सवयीनं त्यांच्या अभिमानाचा जनु खुनच केलेला असतो.

अशा या सगळ्या वातावरणात वाढणारा, आईपासुन दुरावलेला एक उपरा पोर, नशिबाची सगळी दानं उरफाटी पडत असतांना जिद्दीने शिकतो, डॉक्टर होउन त्याच्या आयुष्याची लढाई लढतो अन जिंकतो पण !
गोड गोजिरी, पैश्याच्या राशीत लोळणारी, तुपात भिजवलेली डिझाइनर दु:ख पाहुन डोळे ओले करण्याची सवय लागलेल्या शहरी माणसाला हे कोल्ह्याट्याचं पोराचं अंगावर येणारं, सुन्न करणारं दु:ख सोसवत नाही, पेलवत नाही.
विजिगिषा हा शब्द तोकडा पडावा इतकी ... अक्षरश: इतकी ... चांगले जगण्याची, शिकण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती कोल्ह्याट्याचं पोर दाखवुन जातं!
आयुष्याला लढाईची उपमा द्यायला याहुन योग्य माणुस नसावा कदाचित !

किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!!



पुस्तकाचे नाव : कोल्ह्याट्याचं पोर
लेखक : डॉ. किशोर शांताबाई काळे
प्रकाशन : ग्रंथाली
किंमत : १०० रु.

टिपः डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे २० फेब. २००७ ला अपघाती निधन झाले.

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २००८

दिवाळीच्या शुभेच्छा !!



नमस्कार मित्रांनो,

लोकायततर्फे आपणास दिवाळीच्या अनेक शुभेच्छा.
दिवाळी म्हटले की काय आठवते ? फटाके, लाडु-करंज्या, नवे कपडे आणी हो दिवे !! दिव्यांचाच तर हा सण, दिवाळी. प्रकाशपुजना दिवस. आपल्या भारतियांचा आवडता सण. दिवाळीच्या दिवशी अमावस्या असते, अमावस्येच्या रात्रीच्या किर्र अंधाराला आपण दिवे लाउन, आतिषबाजी करुन आव्हान देतो. त्यात छोट्या छोट्या पणत्या पण हिरीरीने भाग घेतात, त्या पणतींतली इवलीशी ज्योत हीच दिवाळीच्या महोत्सवाची खरी प्राणशक्ति, अल्प स्वल्प अंध:कार आणि त्या अंध:काराला जिंकणारी मातीच्या पणतींतली इवलीशी जळती वात.
लोकायतही आज त्या पणतीच्या रुपातच आहे, संगणक आणी निगडीत तंत्रज्ञाबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अजुन बराच अंधार आहे. लोकायत आपल्या परीने प्रयत्नरत आहेच. महत्वाचा आहे तुमचा सहभाग. या !! मिळुन या पणतीला तेजाने झळाळणारा सुर्य बनवुयात !

सध्या लोकायतवर संगणक विषाणू , मराठीतून सी शिका, आणि लिनक्स बद्दल माहितीचे लेख प्रामुख्याने आहेत. तसेच येथील प्रश्नमंचात मोबाईलवर मराठी संकेतस्थळे, पीईएफ बनवा आदीचे लेख आहेत. आगामी दिवसात मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर्स बद्दल लिखाण तसेच काही मुक्तस्त्रोत प्रकल्प सुरु करण्याचा मानस आहे. काही प्रणालींच्या भाषांतराचे काम करण्याचाही मानस आहे. त्याचा श्रीगणेशा म्हणुन वर्डप्रेस या मुक्तस्त्रोत प्रणालीचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे. लवकरच ते लोकायत डॉट कॉम वर विनामुल्य उपलब्ध करुन दिले जाईल. आज अनेक लोक त्यांचे ब्लॉग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात पण सद्यस्थितीत संपुर्ण मराठी असे एकही टुल अस्तित्वात नाही. लोकायतच्या या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे ही अडचण कायमची दुर होईल. लोकायत डॉट कॉम तर्फे याच्या वापरकर्त्यांना विनामुल्य संपुर्ण सपोर्ट दिला जाईल. अजुन एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे व्हिडिओ ट्युटोरिअल्सचा. सर्वसाधारण माणसाला संगणकाच्या दैनंदिन वापराच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्स उपलब्ध करुन दिले जातील.

आपणास दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. लोकायतने दिवाळीसाठी काही शुभेच्छापत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. आपल्या स्नेह्यांना शुभेच्छा पोचवण्यासाठी कृपया या लिंकवर या : http://www.lokayat.com/diwali.html

संपादन मंडळ
लोकायत.कॉम.
लोकांकडून - लोकांसाठी

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २००८

कॅनव्हास

मानसीचा चित्रकार तो,
तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो.

हृदयनाथांच्या आवाजात अशी सुंदर पदं ऐकतांना हलकेच डोळा लागावा अन कानावर पडणारे अमुर्त शब्द मुर्त व्हायला लागावेत. मानसीचा चित्रकार खरोखरीच अवतरावा अन त्याने स्वच्छ निरभ्र आकाशालाच त्याचा कॅनव्हास बनवावा. कल्पनेच्या कुंचल्याने सरासर त्याने हात चालवायला सुरुवात करावी अन कल्पनाचित्रांची जादुगरी त्या कॅनव्हासवर उतरु लागावी. साधी साधीशी रानफुले कुंचल्याच्या फराट्यातुन साकारु लागावीत, कधी नितळ वहाणारे पाणी दिसावे तर कधी उमटावे जाळीदार झालेले एखादे पिंपळाचे पान.

झराझरा ती चित्रं मागे पडावीत अन कुंचला गुंतावा एक अगम्य चेहरा रेखाटण्यात. तो चेहरा रंगवण्यात कुंचला पार गुंगुन जावा अन आपण मनाशी तो चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करत रहावा. जसाजसा चेहरा अधिकाधिक उतरावा तसा तसा मी आणिकच प्रश्नांकित होत जावा ! खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्‍याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. मला पुसटशी ओळख लागावी असे वाटताच त्या आसंमतात एक अस्वस्थता भरुन यावी. अचानक चित्रकाराच्या हातुन कुंचला निसटावा अन खोल खोल गर्तेत अदृश्य व्हावा . त्या अर्धवट अनोळखी चेहर्‍यावर जणु हलकेसे स्मित उमटलेय असे वाटावे अन क्षणात सगळे पुसले जावे, तो चित्रकारही दिसेनासा व्हावा. आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्‍याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.

श्वास अडकवणार्‍या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!




या लेखनावरचे मिसळपाव डॉट कॉम वरचे प्रतिसाद पहा.

शनिवार, १६ ऑगस्ट, २००८

लोकायतची मुहुर्तमेढ .. !!




नमस्कार,

आज तुम्हाला या ब्लॉगद्वारे मराठीतील एका नव्या संकेतस्थळाबद्दल माहिती देतांना आनंद होत आहे. १५ ऑगस्ट २००८ ह्या भारताच्या ६१ व्या स्वातंत्रदिनापासून मराठीत लोकायत डॉट कॉम ( http://www.lokayat.com/ ) नावाचे एक नवे संकेतस्थळ सुरू झाले आहे.

लोकायत.कॉम ओळख


या संकेतस्थळाचा मुख्य हेतू इंटरनेटवर संगणकावर मराठीच्या वापरास चालना देणे हा आहे. येथे साध्या सोप्या मराठीतून संगणक व इंटरनेटच्या वापराबद्दल मार्गदर्शक लेख, नवनवीन तंत्रांची मराठीतून ओळख तसेच आपल्या संगणक व इंटरनेटबद्दलच्या अडचणींबद्दल तज्ज्ञांना प्रश्न विचारण्याच्या सोई उपलब्ध आहेत/ उपलब्ध करुन् देण्याचा मानस् आहे.

मराठीचा वापर इंटरनेटवर वाढावा यासाठी अनेक लोक काम करीत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल माहिती, त्यांचे प्रकल्प आदींबाबत सविस्तर वृतांत येथे देण्यात येतील. तसेच मराठी फ्रीलांसर्सची सूची येथे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
या संकेतस्थळावर अत्यंत सोप्या पध्दतीने मराठी लिहीता येते. त्यासाठी वेगळं मराठी टायपींग शिकण्याची गरज नाही. त्यामुळे दहा मिनीटातच आपण या मराठी संकेतस्थळावर सहज होतो आणि लिहू लागतो.


येथे या आणि सदस्य व्हा. एक साधा अर्ज भरून सदस्य होता येते. वाचण्या करिता सदस्य होणे गरजेचे नाही मात्र लेख लिहीण्यासाठी तसेच प्रश्न विचारण्यासाठी मात्र सदस्य होणे गरजेचे आहे.


तुम्ही सुद्धा या प्रकल्पात सामील व्हा. सदस्य व्हा. तुमच्या आवडीच्या तंत्रज्ञानासंबधी लेख लिहा. प्रश्न विचारा, इतरांच्या शंकांना उत्तरे द्या.


तुमचे सहर्ष स्वागत.

धन्यवाद.

-आपलाच आनंदयात्री

लोकांकडून-लोकांसाठी...लोकायत!

उपक्रमावरील लोकायत बद्दलची चर्चा

मंगळवार, १२ ऑगस्ट, २००८

अंकुर

अंधारलेल्या भल्या पहाटे आपल्या गावाने ओलेत्यानेच आपले स्वागत करावं. दाराशी पोचल्या पोचल्या पोचल्या तोच पारिजताकाचा शुभ्र सडा दारी अंथरलेला असावा. अंगणातलं झाडंन झाड ओळखीच हसावं. पावसानं ओलीचिंब ती, माझ्या अंगणातली झाडं, जणु अपार माया निथळत असावीत. घर आल्याची आश्वस्त जाणीव क्लांत मनाला निववुन जावी, इतक्यात सकाळची नांदी देणारी कोकिळेची 'कूहssकूहssss' अशी हाक आसमंतात घुमावी अन टप्पकन एक टपोरा गारेग्गार पाण्याचा थेंब अगदी अचुक कपाळावर पडावा. आशिर्वाद देणारा !



या अश्या निव्वळ सुखाला विषण्ण विलक्षण छेद देउन जाणारा अव्यक्त सल खस्स्कन काळजात रुतावा, सय दाटुन यावी, अन मग असेच बरेच काही, भळाभळा वहाणारे वहात रहावे, तिथेच उभ्या उभ्याच. मनात दाबुन ठेवलेली ती वेदना अशी जर्राशी फट मिळताच उसळुन बाहेर यावी, चुका शोधुन शोधुन आठवल्या जाव्यात, खपल्या उकरल्या जाव्यात. मग चालु रहावे द्वंद्व अशाच विचारांचे अन खोटारड्या वांझोट्या स्वप्नांचे. स्वागत करणारे हसरे घर आता हिरमुसले वाटायला लागते, त्याला आपला केवडा हवा असतो,त्यासाठी त्याचे आक्रंदन अन केवड्याच्या मनात काही वेगळेच. अशी का बरे दर आनंदाच्या क्षणाला तुझी आठवण यावी ? का जाणवावी हलकीशी थरथर ? का बरे व्हावा आवाज कातर ?



एव्हाना बरिचशी फुले मी ओंजळीत जमा केलेली असतात अन समोर सुहास्य वदनाने ती वात्सल्यमुर्ती उभी असते, आई ! तिच्या हातातल्या दुरडीत खुप सारी रंगेबीरंगी फुले असतात, काही फुलांना काटेही असतात अन काही मंजुळाही असतात. माझीही ओंजळ हलकेच त्या दुरडीत रिती होते, त्या फुलांमधे आता माझ्या ओंजळीतली फुलंही सामावलेली असतात. मी हलकेच तिच्या पायाशी वाकतो, डोक्यावरुन तिचा आश्वस्त हात फिरतो अन फुलाचा झाडाच्या दिशेने एक अनोखा प्रवास सुरु होतो. आकाशात तांबडे फुटलेले असते अन आताशाच रुजवलेल्या एका बीजालाही एक छोटा हिरवा अंकुर फुटलेला असतो.



शुक्रवार, ४ जुलै, २००८

भुंगा




अजाण भुंगा एका दिवशी
बागेमध्ये भ्रमरत होता
नाजुक सुंदर फुले आगळी
अन थोडिशी कोळी जाळी

अल्लड सावज अवचित आले
भराभरा ते जाळे विणले
कोळी वदला फुला आपला
स्नेह निराळा सख्य निराळे

त्या वेड्याला पाहुन पटकन
फुलानेच एक जाळे विणले
होता कोळी हरकामी तो
भराभरा तो डाव मांडला

उधळुन देता परागसुमने
भुंगा वेडा धावत आला
भुंगा वेडा असाच होता
आप्तांपासुन दुरावलेला

दिसता कोमल फुल आगळे
वेडा भुंगा मोहित झाला
झेप घेउनी मर्म स्थळावर
गुज फुलाचे ऐकत बसला

फुलही वदले शोककथा ते
अनाघ्रात मी सुंदर होते
पण जगाची तर्‍हाच न्यारी
कुस्करले अन गचाळ म्हटले

कोळ्याने मज घात हा कला
सभोवती हे जाळे विणले
तुच आगळा माझ्यासाठी
पटकन उडला सत्वर आला

वेडा भुंगा ऐकत बसला
दु:खी झाला कष्टी झाला
कोळ्याने तो करता इशारा
फुल लागले पंख मिटाया

समजुन कावा भुंगा वेडा
यत्न निसटण्या करु लागला
फुल म्हणाले वेड्या भुंग्या
कावा तुज का नाही उमगला

ये आता ये शोषुन घे मग
मधुरस पाहिजे हवा तेवढा
खजिल भुंगा शेवटचा तो
प्रणय करण्यास अधिर झाला

दुज्या सकाळी रविकिरणांनी
फुलास नाजुक पुन्हा उठवले
निसटुन गेले कलेवर काळे
अनायसे ते जाळ्यात पडले.
..